अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाची मोर्चेबांधणी
उमेदवाराच्या नावावर सस्पेन्स कायम

* पोटे महाविद्यालयात भाजपा कार्यकर्ता मेळावा, अध्यक्ष चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
* मतदार नोंदणी मोहिमेला भाजपाचे प्राधान्य
अमरावती /26 सप्टेंबर : पुढील वर्षी होणार्या विधानपरिषद निवडणुकांकडे राज्याचे राजकीय वातावरण वेगाने झुकू लागले असून अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ हा भाजपासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अमरावती शहरातील प्रवीण पोटे महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात शुक्रवारी मोठी बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. बैठकीत निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषत: मतदार नोंदणीच्या प्रक्रियेवर अधिक भर देण्यात आला. शिक्षक मतदारसंघात सर्व बाजूंनी काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतात. 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणी होणार आहे आणि त्यात पात्र प्रत्येक शिक्षकाची नोंदणी झाली पाहिजे, हे पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे. ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असल्याने कार्यकर्त्यांनी शिक्षकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून देणं महत्वाचं आहे. मी स्वतःही या मोहिमेत सहभागी होणार आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. बैठकीत पुढील निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवाराच्या नावावरही चर्चा रंगली. पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवार निश्चित केलेला नसला तरी अमरावती जिल्ह्याचे माजी अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे तसेच भाजप शिक्षक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद गढीकर ही नावे इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. कोणाचं नाव अंतिम होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. या बैठकीस राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी खासदार आणि भाजप नेते नवनीत राणा, अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, खामगावचे आमदार आकाश फुंडकर, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तसेच माजी राज्यमंत्री रणजीत पाटील यांसारखे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या नेत्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या धोरणांबाबत आणि संघटनात्मक तयारीबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, बैठकीनंतर अमरावती शहरातील पंचवटी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाहनावर सोयाबीन फेकत निषेध नोंदवला. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, राज्यातील सर्व शेतकरी सध्या अडचणीत आहेत आणि या कठीण परिस्थितीत सरकार त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं आहे. नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल, हे आधीच सरकारने स्पष्ट केलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात भाजपाने सुरू केलेली मोर्चेबांधणी पाहता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे. आगामी काही दिवसांत मतदार नोंदणी मोहिमेला अधिक वेग मिळणार असून त्यानंतर उमेदवार निश्चितीची दिशा ठरेल. सध्या मात्र भाजपाने संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरायची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आयोजित बैठकीला राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा, अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, खामगावचे आमदार आकाश फुंडकर, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी राज्यमंत्री रणजीत पाटील उपस्थित होते. या निवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार अद्याप निश्चित नाही; मात्र भाजपाचे अमरावती जिल्ह्याचे माजी अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, भाजप शिक्षक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद गढीकर यांच्या नावाची चर्चा आहे.




