बाजोरीया सुप्रीम कोर्टात, 12 जूनला सुनावणी होण्याची शक्यता
सोमवारी ऑनलाईन याचिका दाखल

जिल्हाधिकार्यांसह सर्व उमेदवार प्रतिवादी
अमरावती /8 जून- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत माजी आ. विप्लव बाजोरिया यांचे नामांकन जिल्हा निवडणूक विभागाने अपात्र ठरवले आहे. या निर्णयाला आव्हान देत माजी आ. विप्लव बाजोरिया यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रविवारी सायंकाळी 4.35 वाजता त्यांच्यावतीने अॅड. अमरसिंग यांनी ऑनलाईन विशेष अनुमती याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात केस नं.021601/2026 ही विशेष अनुमती याचिका दि.8/6/2026 रोजी कोर्टात अधिकृतपणे नोंदवल्या व तपासल्या गेली आहे. प्रतिवादी असलेले विप्लव गोपीकिशन बाजोरीया यांनी प्रतिवादी म्हणून 1) जिल्हाधिकारी 2) निलेश ताराचंद विश्वकर्मा 3) प्रशांत श्रीधर महल्ले 4) हर्षजीत अनंत देशमुख 5) प्रवीण पोटे यांना केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ऑनलाईन रेकॉर्डनुसार सध्या केस रजिस्टर्ड झालेली असून यावर कोणताही निर्णय किंवा निकाल लागलेला नाही. हे अद्याप प्रलंबित आहे. ही केस बहुधा 12 जून रोजी सुप्रीम कोर्टासमोर लिस्ट केल्या जावू शकते. कोर्टाच्या दैनंदिन कामकाजानूसार या तारखेत ऐनवेळी बदल केल्या जावू शकतो. जर ही याचिका सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीसमोर आली तर त्या दिवशी कोर्ट याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेवून पुढील दिशा ठरवेल. ज्यामध्ये प्रतिवादींना नोटीस पाठविणे किंवा केस डिसमिस करणे असे दोन्हीही पर्याय खुले आहेत. त्यामूळे नेमके काय होणार याबद्दल अनिश्चितता आहे. विप्लव बाजोरीया सुप्रीम कोर्टात जाणार नाही असे सांगितल्या जात असतांना आता त्यांनी मात्र सुटीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल करुन नव्या लढ्याला प्रारंभ केला आहे.




