आ.सुहास बाबर यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व ‘हरित क्रांती’

हजारो तरुण मोहिमेत सहभागी

अमरावती/15 मे-एकीकडे राजकारणात गणिते मांडली जात असताना, खानापूर-आटपाडी मतदारसंघात मात्र आ.सुहास बाबर यांच्या नेतृत्वात एक अभूतपूर्व ’हरित क्रांती’ आकाराला येत आहे. केवळ राजकीय वारसा न जपला, तर निसर्गाशी घट्ट नाळ जोडणार्‍या दिवंगत अनिलभाऊ बाबर यांच्या विचारांना कृतीतून जिवंत ठेवण्याचे काम सुहास बाबर करत आहेत. अडगळीतील पिंपळ झाडाचे प्राण वाचवून त्याच्या पुनर्रोपणातून सुरू झालेला हा छोटासा प्रवास, आज हजारो लोकसहभागातून ’ट्री आर्मी’च्या एका महाकाय चळवळीत रूपांतरित झाला आहे.
निवडणुकीत मिळालेले 78 हजार 178 मतांचे प्रचंड अधिक्य, हे केवळ विजयाचे प्रतीक न राहता तेवढ्याच संख्येने मतदारसंघात वृक्षारोपण करण्याचे ध्येय आमदारांनी बाळगले आहे. एका पिंपळाच्या झाडाने दिलेल्या प्रेरणेतून आज खानापूर-आटपाडीचा परिसर हिरवाईने नटत असून समाजमाध्यमांवरील एका आवाहनाला साद देत हजारो तरुण या मोहिमेत स्वतःहून जोडले जात आहेत. लोक स्वतःहून जमीन, पाणी आणि श्रमाचा वाटा उचलत असल्याने या मोहिमेला ’ट्री आर्मी’ असे नाव स्वतः जनतेनेच दिले आहे. आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रीत्यर्थ 5 हजार 300 आंब्यांच्या कलमांची केलेली लागवड ही या मोहिमेची मोठी उपलब्धी ठरली आहे. या उपक्रमाला विटा नगरपालिकेच्या नगरसेवकाने 4 वर्षांची मोठी 52 झाडे भेट दिली असून, आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांची जबाबदारी घेत या हरित मोहिमेला गावस्तरावर बळ दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button