हांगझोऊ आर्चरी एशिया कपमध्ये अमरावतीचा झेंडा
मानव जाधवला रौप्य तर अभ्युदय पखालेला कांस्यपदक

आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी
अमरावती/24 नोव्हेंबर : चीनमधील हांगझोऊ येथे पार पडलेल्या ’आर्चरी एशिया कप – वर्ल्ड रँकिंग टूर्नामेंट (स्टेज-3)’ या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या क्रीडा प्रबोधिनीच्या दोन प्रतिभावान खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आहे. युवा तिरंदाज मानव गणेशराव जाधव याने पुरुष कंपाउंड सांघिक गटात रौप्यपदक, तर अभ्युदय अमोल पखाले याने पुरुष रिकर्व्ह सांघिक गटात कांस्यपदक पटकावले आहे.
मानव जाधव याने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण केला होता. वैयक्तिक पात्रता (क्वालिफिकेशन) फेरीत 720 पैकी तब्बल 711 गुणांची कमाई करत त्याने 43 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांमध्ये अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर पुरुष कंपाउंड सांघिक गटात मानव जाधव, गणेश मणी रत्नम थिरुमुरु आणि मोहित भाटी या भारतीय त्रिकुटाने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईचा 234-230 असा, तर उपांत्य फेरीत सिंगापूरचा 231-224 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून 234-229 अशी निसटती हार पत्करावी लागल्याने भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अभ्युदय अमोल पखाले याने पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक गटात चमकदार कामगिरी केली. अभ्युदयसह उज्ज्वल धामा आणि गोल्डी मिश्रायांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियावर 5-3 अशी मात केली. कांस्यपदकासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात 4-4 अशी बरोबरी झाली. मात्र, त्यानंतर झालेल्या ’शूट-ऑफ’मध्ये भारतीय संघाने बाजी मारत कांस्यपदकावर नाव कोरले.एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमरावती क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडूंनी मिळवलेल्या या दुहेरी यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. या यशाबद्दल क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य तथा अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, प्रशिक्षक अमर जाधव तसेच प्रबोधिनीतील खेळाडू व पालक वर्गाने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.