धैर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा संकल्प

शंभूराजांच्या आदर्शांचे स्मरण करत समाजात एकता

आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 व्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना

अमरावती/15 मे – स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अपराजित योद्धा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 369 वा जन्मोत्सवा निमित्य छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आयोजित मानवंदना कार्यक्रम व लोक गायक अवधूतजी गांधी यांच्या भक्ती शक्ती संगम सोहळ्याला अमरावतीकरांची हजारोंच्या संख्येने मोठी उपस्थिती होती. यावेळी समस्त शिव -शंभू प्रेमींनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना अर्पण करून त्यांचा इतिहास , विचार , शौर्य , आदर्श व बलिदानाचे स्मरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य संजय खोडके साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके तसेच विशेष अतिथी श्री.अवधूतजी गांधी , तसेच शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश खोडके, स्मारक समितीचे अध्यक्ष संकेत महल्ले , सचिव आकाश हिवसे, निमंत्रक ऋतुराज राऊत तसेच मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले कि , छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झाले आणि त्यांच्या शौर्याने स्वराज्य रक्षणचा सर्वात मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची पताका उंचावत ठेवली. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या शौर्यगाथा आजही तरुण पिढीला प्रेरणा देणार्‍या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचे जतन, विचारांचे आणि आदर्शांचे स्मरण करत समाजात एकता, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा सर्वानी आजच्या प्रसंगी संकल्प करण्याचे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले. दरम्यान महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेता अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मानवंदना कार्यक्रमा नंतर महाराष्ट्राला सुपरिचित असलेले प्रख्यात लोकगायक व कलावंत श्री.अवधूतजी गांधी यांनी आपल्या सुमधुर वाणीतून भक्ती संगीत व शिव-शंभू यांची ख्याती विशद करणार्‍या संगीतमय कार्यक्रमाची रंगतदार प्रस्तुती दिली. ज्यामध्ये अवधूत गांधी यांनी संतवाणी , भक्तिगीते, अभंग, भारूड, गोंधळ, अशा लोकगायनाची प्रस्तुती देऊन संपूर्ण परिसर भक्तिमय करून सोडला. या रंगतदार कार्यक्रमातून मराठामोठ्या संस्कृतीचे दर्शन व वारकरी सेवेचा वारसा जपत शिवकालीन घटना व प्रसंगांना उजाळा मिळाला. श्री. अवधूत गांधी यांनी सादर केलेले देह विठ्ठल.. तसेच ’पावनखिंड’ चित्रपटातील ’युगात मांडली’ तसेच ’शिवबा राजा’ सारख्या वीर रसात्मक गाण्यांच्या सादरीकरणामुळे या कार्यक्रमात चांगलीच बहर आली. अवधूत गांधी यांच्या कार्यक्रमात तबला वर पांडुरंगजी पवार, हार्मोनियम वर अभय नालगे , पखवाज राजेंद्र महाराज बघे, संबळ वादन सोमनाथ तरटे , ढोलकी प्रतीक डोळस , ताल गायन साथ विजय सोनोने यांनी अप्रतिम साथसंगत दिली. ज्याला उपस्थित रसिक व प्रेक्षक वर्गाची भरभरून दाद मिळाली. यावेळी त्याबरोबर या कार्यक्रमात जबरदस्त संबळ वादन , तबला व ढोलकीच्या जुगलबंदीने उपस्थितांमध्ये प्रचंड जोश संचारला होता. तसेच आकर्षक रोषणाई, प्रकाश व्यवस्था, सजावट, ढोल पथक, देखील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप जुनघरे यांनी केले. या अभूतपूर्व संगीतमय संध्येला अमरावतीकर जनतेची हजारोंच्या संख्येने मोठी उपस्थित होती. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्वनिमित्य आयोजित मानवंदना व भक्ती-शक्ती संगम सोहळ्यांना उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, शिव-शंभू प्रेमी तसेच अमरावतीकर जनतेचे शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button