मनपाचे 3 कामगार निलंबित 78 कामचुकारांना नोटीस
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर आयुक्तांची कडक कारवाई

अमरावती /25 मार्च : शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्यांविरुद्ध महापालिका प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या थेट आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी मोठी कारवाई करत बडनेरा झोनमधील 3 सफाई कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले असून, तब्बल 78 कर्मचार्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागात मोठी खळबळ उडाली असून कामात दांडी मारणार्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वी महिला दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचर्याच्या ढिगार्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी आमदार सुलभा खोडके, संजय खोडके आणि रवी राणा यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या होत्या. सफाई कामगार केवळ तास-दीड तास काम करून गायब होतात आणि शहरात घाणीचे साम्राज्य पसरते, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या होत्या. यावर तत्काळ पावले उचलत पालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी मंगळवारी उशिरा ही दणकेबाज कारवाई केली. बडनेरा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत कार्यरत असलेले मांगीलाल पटेल, गोपाळ यादव आणि रोहित चव्हाण या तिघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते, मात्र तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. यासोबतच स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करणार्या इतर 78 कर्मचार्यांनाही प्रशासनाने शेवटची ताकीद दिली आहे. अमरावती महापालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचार्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
स्वच्छतेचा फज्जा उडवणार्यांना घरचा रस्ता-शहराच्या स्वच्छतेसाठी जनतेचा पैसा खर्च होतो, मात्र कर्मचारी कामावर न थांबता पळ काढत होते. या बेशिस्त वर्तनामुळे अखेर प्रशासनाने निलंबनाचे हत्यार उपसले असून 78 जणांवर टांगती तलवार कायम आहे.




