देशातील परिस्थिती गंभीर सर्वपक्षीय बैठक बोलवा
पंतप्रधान मोदी यांच्या या भूमिकेवरील शरद पवार यांची पत्रकार परिषदेत मागणी

मुंबई/14 मे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन केलं आहे. यासाठी खासगी वाहनांचा वापर करणे, सोने खरेदी न करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे, वर्क फ्रॉम होम करणे असं आवाहन मोदी यांनी देशाच्या जनतेला केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या भूमिकेवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत जे वक्तव्य केलं ते अयोग्य होतं, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि स्वत: या बैठीकाला हजर राहावं, असं शरद पवार म्हणाले आहेत. मी विनंती केली, परिस्थिती किती गंभीर आहे, अशावेळेला देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक अनेकदा आपण बोलवतो तशी बैठक बोलवावी. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हजर राहावं. याआधी गेले तीन-चार वर्षांत सर्वपक्षीय बैठका झाल्या. पण त्यापैकी एकाही बैठकाला पंतप्रधान उपस्थित नव्हते. परिस्थिती गंभीर आहे, असंच चालू राहिली तर किती गंभीर परिणाम होतील हे जे पंतप्रधान सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याची तितक्याच गांभीर्याने सर्वांनी नोंद घ्यावी. त्यासाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. आज मी सकाळपासून टीव्ही पाहतोय. कुणी मोटरसायलवर जात आहे. कुणी आपल्या ऑफिसला चालत जातंय. काही जणांनी तर जाहीर केलं की, मी मंत्री आहे, पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. पूर्वी 17 गाड्या ताफ्यात होत्या. त्यावरुन आता आम्ही 8 गाड्यांवर आलो आहोत. मला तर धक्काच बसला. 17 गाड्या ताफ्यात यापूर्वी नेमक्या कशासाठी होत्या? हे काही मी समजू शकलो नाही. कमी केल्यानंतर त्या गाड्या आठवर आल्या. याचा अर्थ या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे यातून स्पष्ट पाहिजे. पूर्वी अशी स्थिती या देशात झाली नव्हती असं नव्हतं. पण ठिक आहे, एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेची आणखी काळजी करावी, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सर्वांनी या प्रश्नावर सहकार्य करावं, असं आवाहन शरद पवारांनी केलं.
मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा अयोग्य-मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काल आणि आजचं स्टेटमेंट पाहिलं. उदाहरणार्थ राहुल गांधी यांच्याबाबत त्यांनी जे शब्द वापरले ते अयोग्य होते. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. तेही संसदेत आहेत. विरोधी पक्षनेता हे एक संविधानिक पद आहे. हे पद लोकसभेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत टाळली तर लोक आपलं स्टेटमेंट अधिक गांभीर्याने घेतात. ते घ्यावेत अशी अपेक्षा आहे, असं शरद पवार म्हणाले.




