प्रथमच जटिल मेंदूतील एन्युरिझम क्लिपिंग शस्त्रक्रिया यशस्वी
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे

अमरावती/5 जून- अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) मेंदूतील एन्युरिझम (रक्तवाहिनी फुगणे) या जीवघेण्या आजारावर डॉक्टरांनी यशस्वी मात केली आहे. 40 वर्षीय रुग्णाला तीव्र डोकेदुखीचा त्रास असल्याने तातडीने दाखल करण्यात आले होते. तपासणीत मेंदूतील रक्तवाहिनीत दोष असल्याचे निष्पन्न होताच, डॉक्टरांच्या टीमने तातडीने कठीण ’एन्युरिझम क्लिपिंग’ शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असली तरी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या कुशल हातांनी ती यशस्वीपणे पार पाडली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली असून, रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. या यशामुळे आता अमरावती विभागातच उच्च दर्जाच्या न्यूरोसर्जरी सेवा उपलब्ध झाल्याने रुग्णांची मोठी सोय झाली आहे. एन्युरिझम हा अतिशय गंभीर आजार आहे. अचानक तीव्र डोकेदुखी, उलट्या, बेशुद्ध पडणे, दुहेरी दिसणे किंवा झटके येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने न्यूरोसर्जनचा सल्ला घ्यावा. दुर्लक्ष केल्यास मेंदूत रक्तस्राव होऊन जीव जाण्याचा किंवा कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो.
या शस्त्रक्रियेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. योगेश सदोकर, डॉ. अंकुश वानखडे, डॉ. वैशाली धांडे, डॉ. श्रीकांत शेंगोकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. राखी वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागडे, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. अश्विनी मडावी, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. रोहिणी राठोड, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, डॉ. दिव्यांती मुंदणे, डॉ. पायल रोकडे, अधिसेविका माला सुरपाम तसेच सिस्टर दिपाली देशमुख, मनीषा रामटेके, शुभम गडवे, स्नेहल काळे, यश गडवे, विजय गडवे, मंगेश लांजेवार, वेदांत इंदुरकर आणि राहुल कावनपुरे यांनी मोलाचे सहकार्य केले.




