दुष्काळात गोधन विकू नका
मुख्यमंत्री फडणवीसांचे शेतकर्यांना आवाहन

उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सन्मान
नाशिक/11ऑक्टोबर : राज्यात पावसाच्या अभावामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकारने 26 सप्टेंबर रोजी राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यानंतर शेतकर्यांसाठी सरकारने अनेक उपाययोजना केला आहे. रविवारी (11 ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात राज्यात पावसाची तूट आणि खरीप पिकांच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना आवाहन केले आहे. तसेच, यावेळी त्यांनी शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. सर्व तांत्रिक निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याची तयारी सुरू केली. प्रत्येक शेतकर्याला मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, त्याचा योग्य वापर करा. धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घ्या आणि पावसाचा प्रत्येक थेंब जपा. संकटकाळात शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य पुरवले जाईल. गोधन-गोवंश विकू नका, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची पूर्ण व्यवस्था सरकार करेल. टंचाईच्या काळात प्रत्येक मजुराला रोजगाराचे काम आणि निधी सरकार उपलब्ध करून देईल. अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पहिला पुरस्कार पटकावला. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणार्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांनाही गौरवण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारही याठिकाणी देण्यात आले आहे. यामध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गावखेड्यांच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.





