मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना जाहीर

शेतकर्‍यांना थेट शेतापर्यंत रस्ता मिळणार

-वाद मिटतील, ग्रामीण संपर्क सुधारेल
-17 सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू
मुंबई / 9 सप्टेंबर : शेतात रस्त्यांमुळे होणारे वाद, शेजारील शेतकर्‍यांमधील भांडणं आणि कटकटी आता इतिहास होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने ’मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना जाहीर केली आहे. या योजनेतून शेतकर्‍यांना थेट शेतापर्यंत रस्ता मिळवून देण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह समितीतील खासदार आणि आमदार उपस्थित होते. त्यावेळी ही योजना जाहिर करण्यात आली.
योजनेअंतर्गत विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. शेतकर्‍यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करणे तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करणे निश्चित करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना थेट शेतापर्यंत रस्ता मिळणे, शेतकर्‍यांमधील वाद मिटणे, शेतातील संपर्क सुधारून माल बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होणे हे या योजनेचे मुख्य लाभ आहेत. योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी 17 सप्टेंबरपासून केली जाणार आहे.
योजनेसाठी सर्व शेताचे सीमांकन करणे आवश्यक आहे. सर्व आमदारांनी पाणंद रस्त्यांचे नकाशे तयार करून गावांमध्ये प्रकाशित करावेत. सध्या 13 विविध योजना माध्यमातून निधी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. शेतकर्‍यांसाठी ही योजना क्रांतिकारक ठरणार आहे. रस्ता, वीज आणि पाणी शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहोचल्यास त्यांचा माल सहज बाजारपेठेत पोहोचवता येईल. सरकारने यावर प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button