कोळसा खाणीत भीषण स्फोट; 16 कामगारांचा मृत्यू

शिलाँग /5 फेब्रुवारी : मेघालय राज्यात गुरूवारी अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला. त्या दुर्घटनेत 16 कामगार मृत्युमुखी पडले. तर, अनेक जण खाणीतील ढिगार्‍याखाली अडकले. दुर्घटनेची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मेघालयच्या पूर्व जयन्तिया हिल्स जिल्ह्यात अवैध खाणकामावेळी स्फोट झाला. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यामध्ये विविध यंत्रणा सहभागी झाल्या. स्फोटावेळी खाणीत नेमके किती कामगार होते ते तूर्त समजू शकले नाही. स्फोटानंतर कोसळलेला खाणीचा ढिगारा उपसून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या रॅट-होल मायनिंग पद्धतीच्या अवलंबावेळी दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या पद्धतीत जमिनीमध्ये उंदरांच्या बिळांसारखे अरूंद भुयारे खोदून कामगार कोळसा बाहेर काढतात. तशा भुयारांमध्ये एकच माणूस शिरू शकतो. पर्यावरणाची हानी, सुरक्षाविषयक धोके विचारात घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने वर्ष 2014 मध्ये मेघालयात रॅट-होल मायनिंग आणि इतर अशास्त्रीय खाणकामावर बंदी घातली.

संबंधित बातम्या

Back to top button