श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा; खेळाडूचा सत्कार
44 खेळाडुंचा मान्यवरांचे हस्ते गौरव

अमरावती /17 मार्च : अमरावतीच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पदवीदान आणि गुणवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. खेळातून केवळ शरीरच नव्हे तर चारित्र्य घडते, याचा प्रत्यय या सोहळ्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील 44 खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलेला ठसा आणि पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद, यामुळे संपूर्ण परिसर चैतन्याने न्हाऊन निघाला होता. संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यापीठाच्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे तोंडभरून कौतुक केले आणि भावी आयुष्यात उत्तम नागरिक व यशस्वी उद्योजक बनण्याचा कानमंत्र दिला.
अमरावतीच्या मातीतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष बनसोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. विद्याधर उर्फ भैय्यासाहेब मेटकर आणि महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मनोहरराव देशमुख यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, खेलो इंडिया, अश्वमेध आणि आंतरविद्यापीठ अशा विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या 44 खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. पुष्पलता देशमुख यांनी गुणवंतांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये मृदू चेंडू (सॉफ्टबॉल) खेळात सुवर्णपदक पटकावणारी वैष्णवी गिरी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राजकमल, करणीपाल सिंग, सुपर्णा दास, काजल राणी, हेमंत साबळे आणि पूजा रहाटे या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशात प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमांचा मोठा वाटा असल्याचे मत प्रथम क्रमांक पटकवणार्या राजकमल याने व्यक्त केले. कार्यक्रमाचे नेटके संचालन प्रा. जितेंद्र राऊत यांनी केले तर डॉ. सरोजनी उंबरकर यांनी सर्वांचे आभार मानले.




