‘साहेब येणार’च्या अफवेनेच राज्यातील बाजारपेठांना कुलूप

आयएएस तुकाराम मुंढेंचा धसका!

गुटखा माफियांचे धाबे दणाणले

बुलढाणा/15 जून-राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (ऋऊअ) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कठोर कार्यपद्धतीचा राज्यभर एवढा धसका घेण्यात आला आहे की, केवळ ते तपासणीसाठी येणार असल्याच्या अफवेनेच मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
याचेच एक ताजे उदाहरण बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळाले. मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथे सोशल मीडियावर ’एफडीएचे साहेब तपासणीसाठी येणार’ असा एक मेसेज वार्‍यासारखा पसरला. या केवळ एका मेसेजमुळे व्यापार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि काही मिनिटांतच संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. कारवाईच्या भीतीने किराणा व मिठाईच्या दुकानांसह पानटपर्‍या आणि हॉटेल चालकांनीही आपली दुकाने तातडीने बंद करून तेथून पळ काढला.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका-तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडेही वळवला आहे. या धडक कारवाईचा धसका घेत अनेक छोटे-मोठेव्यावसायिक, हॉटेल चालक, तसेच किराणा आणि मिठाईच्या दुकानदारांनीही आपली दुकाने बंद करून पळ काढण्यातच धन्यता मानली. विशेषतः भेसळ करणारे आणि अवैध मार्गाने व्यवसाय करणारे व्यापारी आता चांगलेच धास्तावले असून, साहेबांच्या कारवाईच्या भीतीने त्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवण्यास पसंती दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button