आ. संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले

मयत मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न उघड

बुलढाणा/2 डिसेंबर – बुलढाणा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी आज, 2 डिसेंबर 2025 रोजी सुरू असलेल्या मतदानादरम्यान बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा आणि आयटीआय मतदान केंद्रांवर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याला बोगस मतदान करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्याला चोपही देण्यात आला होता. परंतू, याचवेळी आमदार पुत्राने पोलीस कर्मचार्‍याचा हात धरून ठेवत या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी याप्रकरणी थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा पूत्र आणि उमेदवार कुणाल गायकवाड तसेच आमदारांचा पुतण्या श्रीकांत गायकवाड यांनी बोगस मतदान करणार्‍या पदाधिकार्‍याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रण केले असून ते समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमध्ये आमदाराचा मुलगा कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड हे बोगस मतदारास पळून जाण्यास मदत करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
भाजप जिल्हाध्यक्षांची मागणी-बोगस ओळखपत्र बनवून मतदान करण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे आणि बोगस मतदारास पळून जाण्यास मदत करणे, अशा गंभीर गुन्ह्यांसाठी दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी केली आहे.

आमदाराच्या मुलासह 4 जणांवर गुन्हा दाखल

बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी केंद्रावर दुसर्‍याच्या नावावर बोगस मतदान करणार्‍या तिघांना विरुद्ध आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघाजणांविरुद्ध गुन्हा करण्यात आलाय.
शासकीय कामात अडथळा आणला याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा आणि या प्रभागाचे उमेदवार कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

Back to top button