1112 उमेदवारांचे भाग्य तीन आठवड्यांसाठी ईव्हीएममध्ये ‘लॉक’
21 डिसेंबरला 11 नगरपरिषदांचे सत्तासमीकरण स्पष्ट होणार

अमरावती /2 डिसेंबर – जिल्यातील सर्व 11 नगरपरिषदांच्या निवडणुकांचा राजकीय श्वास अक्षरशः रोखून धरणारा निर्णय आज न्यायालयातून बाहेर आला असून, 1112 उमेदवारांचे भवितव्य आता पुढील 20 दिवस ईव्हीएममध्येच बंदिस्त राहणार आहे. वरुड ते चिखलदरा आणि मोर्शी ते अचलपूरपर्यंत हजारो मतदारांनी आज मतदानाद्वारे दिलेला कौल 21 डिसेंबरपर्यंत स्ट्राँगरुममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत जपला जाणार आहे.
अमरावती जिल्यात एकाच दिवशी वरुड, मोर्शी, धारणी, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, दर्यापूर, चिखलदरा, अचलपूर आणि धामणगाव रेल्वे या 11 नगरपरिषदांमध्ये मतदानाची धामधूम पार पडली. या नगरपरिषदांमध्ये 11 नगराध्यक्ष पदांसाठी 64 उमेदवार आणि 270 नगरसेवक पदांसाठी तब्बल 1048 उमेदवार मैदानात होते. त्यामुळे एकूण 1112 उमेदवारांचे राजकीय भाग्य आता तीन आठवड्यांसाठी ईव्हीएममध्ये ‘लॉक’ होणार आहे. मतमोजणीच्या तारखेवर उच्च न्यायालयाने आज घेतलेल्या मोठ्या निर्णयाने या सर्व नगरपरिषदांची उत्कंठा आणखी तीव्र केली. उद्या होणारी मतमोजणी तात्काळ स्थगित करून ती 21 डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपरिषद- नगरपंचायत निकालांसह जाहीर करण्याचे आदेश देताच जिल्यातील राजकीय गणिते बदलली. न्यायालयाने स्पष्ट ठाम मत नोंदवले की काही नगरपरिषदांचे तातडीने जाहीर होणारे निकाल इतर स्थगित निवडणुकांवर परिणाम करू शकतात. यामुळे अमरावती जिल्यातील स्ट्राँगरुमवर तीन आठवडे कडक पहारा ठेवावा लागणार आहे. विविध तहसील कार्यालये, आयटीआय आणि शासकीय इमारतींमध्ये तयार करण्यात आलेल्या या स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएमची सुरक्षितता राखण्यासाठी पोलिस दलाला अतिरिक्त तैनाती करावी लागेल. निवडणूक यंत्रणेचे कामकाज, खर्च आणि शिस्तबद्धता यात मोठी वाढ होणार आहे. उमेदवारांसाठी हा प्रतीक्षाकाळ सर्वाधिक आव्हानात्मक ठरत आहे. तीन आठवड्यांचा ताण, अनिश्चितता आणि राजकीय चर्चा यामुळे जिल्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली तरी काहीजणांनी सर्व निकाल एकाच दिवशी झाल्याने पारदर्शकता वाढेल, असेही मत व्यक्त केले. 21 डिसेंबरला मतमोजणी होताच अमरावतीतील या 11 नगरपरिषदांचे सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण प्रतीक्षा, अंदाज आणि थराराच्या सावटाखालीच राहणार हे निश्चित.




