मतदारांसह उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क

मतदानाची सकाळी उत्साहवर्धक सुरवात

* मशीन बिघाडाने पडला खंड, तरीही सुधारणा तातडीने

* वृद्ध आणि दिव्यांग मतदारांचा सहभाग, पहिल्यांदा मतदान करणार्‍यांमध्ये उत्साह

* 29 संवेदनशील केंद्रांवर पोलिस बंदोबस्त दिवसभर शांती
* रात्री उशिरा मतपेट्या सुरक्षितपणे संकलित

अचलपूर /2 डिसेंबर : परतवाडा नगरपालिका निवडणुकीत आज झालेल्या मतदानाने लोकशाहीचा खरा उत्सव साजरा झाला. पहाटे साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होताच शहरातील सर्व केंद्रांवर मतदारांची लगबग दिसू लागली. नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवार, तसेच विविध प्रभागांतील सदस्य पदांसाठी अनेक उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची दाट शक्यता असल्याचे चित्र सकाळपासूनच उमटले.
सकाळपासून महिलांची आणि युवकांची विशेष उपस्थिती दिसत होती. अनेक ठिकाणी मतदान केंद्रे उघडण्याच्या आधीच मतदार ओळीत उभे असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. हवेत गारवा असूनही नागरिकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत केंद्रांकडे लवकरात लवकर धाव घेतली. काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती, तर काही ठिकाणी मतदार शांतपणे रांगेत उभे राहून मतदानासाठी वाट पाहत होते. मतदान सुरळीत सुरू असताना परतवाड्यातील प्रभाग क्रमांक सहा येथील खोली क्रमांक तीनमध्ये अचानक मतदान यंत्र बंद पडल्याने सुमारे दीड तास मतदान ठप्प झाले. संबंधित अधिकार्‍यांनी तांत्रिक पथकाला याची माहिती देताच त्यांनी नवीन मशीन उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. या काळात केंद्रावर मोठी रांग लागली असली तरी मतदारांनी पूर्ण संयम राखला आणि शांततेत आपली पाळी येण्याची प्रतीक्षा केली. वृद्ध मतदारांचा सहभाग निवडणुकीतील एक भावनिक दृश्य ठरले. सात दशकांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रांवर पोहोचून आपला हक्क बजावत होते. काहींना नातवंडे, आप्तेष्ट किंवा बूथवरील प्रतिनिधींच्या मदतीने मतदान करता आले. त्यांच्या निर्धारामुळे लोकशाहीप्रती असलेला आदर पुन्हा अधोरेखित झाला. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांनीही मतदानात आनंदाने सहभाग घेत, अडचणींना न जुमानता लोकशाही प्रक्रियेबद्दलची निष्ठा दाखवून दिली. युवकांचा उत्साह तर सर्वाधिक लक्षवेधी ठरला. पहिल्यांदाच मतदान करणारे अनेक तरुण-तरुणी आज पालकांसह मतदान केंद्रावर पोहोचले होते. आपल्या बोटावर पहिल्यांदाच मतदानाची शाई लावली जाणार असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. काही युवकांनी मित्रमंडळींसह समूहाने मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या सुमारास मतमोजणी दिन बदलल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे काही काळ मतदार आणि उमेदवारांमध्ये संभ्रम व निराशा निर्माण झाली. त्यामुळे दुपारी तीन ते पाच या वेळेत काही केंद्रांवर मतदारांची उपस्थिती मंदावली होती. मात्र संध्याकाळी पुन्हा मतदार केंद्रांकडे वळले आणि मतदानाने चांगली गती धरली. शहरातील एकूण 29 अति संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्तळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसाभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक केंद्रावर पोलिस सतत गस्त घालत होते आणि संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवत होते. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन झाल्याने मतदान शांततेत पार पडले. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिवसअखेर समाधान व्यक्त करत सर्व केंद्रांवर कोणतेही अडथळे न येता प्रक्रिया पार पडल्याची माहिती दिली. रात्री साडेनऊपर्यंत काही प्रभागांमध्ये मतदान सुरू होते. मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या 30 वाहनांच्या ताफ्याद्वारे कडेकोट सुरक्षेसह कल्याण मंडपम येथे आणण्यात आल्या. प्रत्येक वाहनासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात होते. मतपेट्या सीलबंद अवस्थेत सुरक्षितपणे त्या ठिकाणी जमा करण्यात आल्या असून येत्या 21 डिसेंबरला होणार्‍या मतमोजणीपर्यंत त्या कठोर सुरक्षायंत्रणेखाली ठेवण्यात येणार आहेत. एकूणच, अचलपूर-परतवाडा शहराने आज लोकशाहीप्रती असलेली निष्ठा, जागरूकता आणि कर्तव्यभाव पुन्हा अधोरेखित करत मतदानाचा दिवस शांततेत आणि उत्साहात साजरा केला.

संबंधित बातम्या

Back to top button