आजपासून एचआयव्हीविरुद्ध व्यापक मोहीम; आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर
डिसेंबरभर जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल

94 हजार तपासणीत 146 संक्रमित आढळले
गरोदर मातांमध्ये संक्रमण वाढण्याची चिन्हे
अमरावती /30 नोव्हेंबर : जिल्ह्यात 2025 सालातील एचआयव्ही प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेतल्यास, आरोग्य यंत्रणा सक्रिय असली तरी संक्रमणाचे धोके अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट दिसते. अडथड्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू या राष्ट्रीय घोषवाक्याखाली जिल्ह्यात संपूर्ण डिसेंबर महिनाभर जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्याची तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 1 वैद्यकीय महाविद्यालय, 1 जिल्हा सामान्य रुग्णालय, 1 जिल्हा स्त्री रुग्णालय, 1 जिल्हा क्षयरोग रुग्णालय, 1 संदर्भ रुग्णालय तसेच 5 उपजिल्हा, 9 ग्रामीण, 60 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 72 नाममात्र शुल्कावर सेवा देणारी खाजगी रुग्णालये अशा विस्तृत आरोग्य जाळ्यातून एचआयव्ही तपासणी मोफत दिली जाते. जिल्ह्यातील दोन एआरटी केंद्रांसह दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, धारणी व इतर ग्रामीण भागातील नऊ लिंक एआरटी केंद्रांतून रुग्णांना नियमित औषधे उपलब्ध करून दिली जातात. प्रशिक्षित समुपदेशक व आरोग्य कर्मचारी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.
एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 94,830 व्यक्तींची एचआयव्ही तपासणी झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. तरीही तपासणीदरम्यान 146 नवीन व्यक्तींमध्ये एचआयव्ही संक्रमण आढळले. या सर्वांवर तातडीने एआरटी औषधोपचार सुरू करण्यात आला असून सीडी-4 आणि व्हायरल लोडसह सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गरोदर मातांमध्ये तपासणी केलेल्या 36,886 महिलांपैकी सात मातांमध्ये एचआयव्ही संक्रमण आढळले आहे. या मातांची विशेष काळजी, उपचार व समुपदेशन सुरू असून यंदा जिल्ह्यात 13 संक्रमित मातांच्या सुरक्षित प्रसूती पार पडल्या. क्षयरोग कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील सर्व एचआयव्ही संक्रमित तसेच समुपदेशनादरम्यान संशयित आढळलेल्या प्रत्येक व्यक्तीची क्षयरोग तपासणी करण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील दोन्ही एआरटी केंद्रांत 7,750 संक्रमित रुग्णांची नोंद असून त्यापैकी 5,000 रुग्ण नियमित उपचार घेत आहेत.उच्चजोखीम गटांसाठी अमरावतीत पाच अशासकीय संस्था सक्रिय आहेत. देहविक्री करणार्या स्त्रिया, तृतीयपंथी समुदाय, पुरुष-पुरुष लैंगिक संबंध असलेली गटसंख्या, स्थलांतरित कामगार आणि ट्रक चालकांसाठी सतत समुपदेशन, तपासणी आणि सुरक्षिततेची साधने पुरवली जात आहेत. गावपातळीवरील लिंक वर्कर कार्यक्रम आणि विहान प्रकल्पांद्वारे एचआयव्ही संक्रमितांच्या जीवनमान उंचावण्याचे कार्य सुरू आहे. जिल्ह्यातील विद्यापीठे, कृषी विद्यापीठ, तंत्र शिक्षण संस्था व विविध महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत 139 रेड रिबन क्लब स्थापन झाले आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर रॅली, पथनाट्य, स्पर्धा, रक्तदान शिबिरे, जनजागृती कार्यक्रम सतत राबवले जात आहेत. डिसेंबर महिन्यात विशेष उपक्रमांत 1 डिसेंबरला प्रभात फेरी, 2 डिसेंबरला समर्पण ट्रस्टचा विशेष कार्यक्रम, 4 तारखेला रॅली आणि 11 तारखेला जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने सायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहे. विविध संस्थांमार्फत रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शने, कामगार मेळावे, एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी पोषण आहार वितरण, तसेच 10 ते 18 वयोगटातील मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात येतील. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन प्रधान सचिव आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हाधिकारी अमरावती, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली.
जिल्हा एचआयव्ही कार्यक्रम-1 डिसेंबर: एड्स सप्ताह उद्घाटन व प्रभात फेरी (पोटे कॅम्पस), 2 डिसेंबर: समर्पण ट्रस्टतर्फे विशेष कार्यक्रम, 4 डिसेंबर: जनजागृती रॅली, 11 डिसेंबर: सायकल रॅली (जिल्हा सायकलिंग असोसिएशन सहकार्याने), 2-15 डिसेंबर: सोशल मीडिया व पोस्टर स्पर्धा, 10 डिसेंबर: कामगार मेळावा – भाग्योदय संस्था.




