मिर्झा एक्सप्रेसचा अखेरचा प्रवास थांबला
वर्हाडी हास्यकाव्याचे दिग्गज कवी डॉ. रफिक अहमद बेग मिर्झा यांचे निधन

अमरावती /28 नोव्हेंबर : मराठी तसेच वर्हाीडी हास्यकाव्याला स्वतंत्र ओळख देणारे ख्यातनाम कवी डॉ. रफिक अहमद बेग मिर्झा (वय 69) यांचे आज पहाटे निधन झाले. काही काळापासून ते अस्वस्थ होते. त्यांच्या निधनाने साहित्य, संस्कृती, सामाजिक आणि कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर-परसोपंत येथील असलेले डॉ. मिर्झा अनेक वर्षांपूर्वी अमरावतीत स्थायिक झाले. इथूनच त्यांनी साहित्यिक कारकीर्द अधिक विस्तृत केली. साध्या, प्रासादिक आणि ओघवत्या शैलीतून हास्य-व्यंग्य मांडणे ही त्यांची खासियत. देशभरातील काव्यमंचांवर त्यांनी निर्माण केलेले हास्याचे विश्व रसिकांना कायम स्मरणात राहील.
त्यांच्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ या काव्यमैफलींच्या हजारो कार्यक्रमांनी देशभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सहा हजारांहून अधिक काव्यप्रस्तुती, 20 काव्यसंग्रहांचे प्रकाशन आणि वर्हााडी बोलीचा ठसका यांनी डॉ. मिर्झा यांनी हास्यसाहित्यात वेगळा आयाम निर्माण केला.
‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’, ‘जांगडबुत्ता’ यांसारख्या लोकप्रिय रचनांनी त्यांनी रसिकांना पोटधरून हसवले, तसेच विचार करायलाही प्रवृत्त केले. विशेष म्हणजे, ‘जांगडबुत्ता’ हा शब्द लोकाभिमुख करून लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. हास्यकाव्याच्या माध्यमातून ते सामाजिक, धार्मिक आणि मानवी विषयांना अत्यंत सहजतेने स्पर्श करीत. भेदाभेदांवर सूचक व्यंग टाकण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी. वृत्तपत्रातील त्यांचा विशेष लोकप्रिय स्तंभ ‘मिर्झाजी कहिन’ वाचकांना नेहमीच भावत असे. डॉ. मिर्झा यांनी साहित्य क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच फकीरजी महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. विदर्भातील साहित्यिक आणि कलाकारांच्या प्रगतीसाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय मानले जातात. त्यांच्या पश्चात पत्नी फातिमा मिर्झा, मुलगा रमीज मिर्झा, तसेच विवाहित मुली जबीन मिर्झा आणि हुमा मिर्झा असा परिवार आहे. दुपारी दोन वाजता वलगाव रोडवरील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघाली. जुमाच्या नमाजनंतर ईदगाह मैदानात नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आला. त्यानंतर ईदगाह परिसरातील कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने वर्हा्डी भाषा, मराठी हास्यसाहित्य आणि विदर्भाचे एक प्रगल्भ, बहुआयामी व्यक्तिमत्त्व कायमचे हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संवेदना
वर्हाडींचे ख्यातनाम कवी डॉ. रफिक मिर्झा यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी हे साहित्य क्षेत्रासाठी मोठे नुकसान असल्याचे सांगून डॉ. रफिक मिर्झा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
अभिनेते भरत गणेशपुरे यांनी घेतले अंतिम दर्शन
डॉ. रफिक मिर्झा यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे जिवलग मित्र असलेले ख्यातनाम अभिनेते भरत गणेशपुरे तातडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांना सांत्वाना दिली. डॉ. मिर्झा यांचा मृत्यू हा साहित्यविश्वासाठी अपूरणीय धक्का असल्याचे त्यांनी सांगितले.




