पुण्यातील दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 2 मोठे गिफ्ट

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय
नवी दिल्ली/26 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्राला दोन मोठे गिफ्ट दिले आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे मुंबई आणि पुण्याच्या नागरिकांना थेट आणि प्रत्यक्ष फायदा होणार आहे. तसेच राज्यभरातील आणि इतर राज्यातील नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यांनी आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत काय-काय निर्णय घेतले याविषयी सविस्तर माहिती दिली.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पहिला मार्ग हा खराडी ते खडकवासला असा आहे. तर दुसरा मार्ग नळ-स्टॉप ते माणिक बाग असा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या दोन्ही मार्गाना मंजुरी देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.दोन्ही मेट्रो प्रकल्पांचा आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला. खराडी ते खडकवासला हा मेट्रो प्रकल्प 25.5 किमी अंतराचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 22 स्टेशन असणार आहेत. यामुळे खूप मोठी कनेक्टिविटी निर्माण होणार आहे. तर दुसरा मार्ग हा नळ-स्टॉप ते माणिक बाग हा 6.1 किमीचा असणार आहे या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी एकूण 9858 कोटी रुपयांचा निधी नियोजित आहे. दोन्ही मार्ग हे एकूण 32 किमीचे असणार आहेत. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे, अशीदेखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसर्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. बदलापूर-कर्जत कॉरिडोअरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला 1324 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, अशीदेखील महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.




