अमरावतीत एकदिवसीय विशेष कार्यक्रम उत्साहात

गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या हौतात्म्य वर्षानिमित्त

* राजकमल चौक परिसर कीर्तन, सेवाकार्य आणि मानवतेच्या संदेशांनी दुमदुमला

* खा.डॉ.अनिल बोंडे व माजी खा.नवनीत राणा यांची उपस्थित

अमरावती / 23 नोव्हेंबर : गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या हौतात्म्य वर्षानिमित्त श्री गुरुसिंह सभा, अमरावती यांच्या वतीने राजकमल चौक परिसरात रविवारी एकदिवसीय विशेष कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमात शहरातील शिख बांधवांसह विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व कीर्तनाने झाली, त्यानंतर कीर्तन दरबार घेण्यात आला. परिसरात त्या क्षणी वा हे गुरु मंत्र, कीर्तन आणि जयघोषांनी आध्यात्मिक उर्जा आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते. समाजसेवेच्या उद्देशाने कार्यक्रमादरम्यान अन्नदान, रक्तदान शिबिर तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. युवकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र देखील आयोजित करण्यात आले. सर्व उपक्रमांत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाला माजी खासदार नवनीत राणा व खासदार डॉ. अनिल बोन्डे यांनी विशेष उपस्थिती लावली. दोन्ही मान्यवरांनी शिख समाजाचे अभिवादन करून या उपक्रमामुळे समाजात ऐक्य, बंधुता आणि सेवाभाव अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त केले. उपस्थित शिख बांधवांचे आणि नागरिकांचे त्यांनी कौतुक केले. समिती पदाधिकार्‍यांनी सांगितले की, शिख समाजाच्या हौतात्म्याची गौरवशाली परंपरा व मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत आणि समाजात परस्पर ऐक्य दृढ व्हावे, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष अमरजीत सिंग जग्गी, सचिव डॉ. निकु खालसा, कार्याध्यक्ष रवींद्र सिंग सलुजा, कोषाध्यक्ष रतन दीप सिंग बग्गा, सरचिटणीस राजेंद्र सिंग सलुजा यांच्यासह दिलीपसिंग बग्गा, गुरविंदर सिंग नंदा, चिरंजीत कौर, सतपाल बग्गा, रवींद्र सिंग, महेंद्रसिंग पोपली, जगदीश लाल छाब्रा, गुरविंदर सिंग मुंगा, नरेंद्र पाल सिंग अरोरा, अमरजीत सिंग जुनेजा, हरप्रीत सिंग गांधी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशात हातभार लावणार्‍या सर्व शिख बांधव व शहरातील नागरिकांप्रती आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button