स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला मंगळवारी

निवडणूक प्रक्रिया जैसे थे सुरू राहणार

* सुप्रिम कोर्टाचे आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश

नवी दिल्ली/19 नोव्हेंबर – राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय होणार, याची टांगती तलवार राज्यकर्ते तसेच सर्व राजकीय पक्षांवर होती. या निवडणुकीत आरक्षणाने 50 टक्के मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आजच्या (19 नोव्हेंबर) सुनावणीत सुरू असलेल्या 42 नगरपंचायती आणि 246 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया थांबणार की सुरूच राहणार, याची चिंता सर्वांना सतावत होती. मात्र, या प्रकरणावर पुढील मंगळवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे सध्याची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मात्र, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा 25 नोव्हेंबरपर्यंत होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. तर याचिकाकर्ते विकास गवळी यांच्याकडून अँड. देवदत्त पालोदकर यांनी बाजू मांडली.
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचार, अर्जांची छाननी झालेली असतानाच अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाहीत, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ओबीसी आरक्षणाची मर्यादा आणि एकूण आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणावर पुढील मंगळवारी (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना सरसकट 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मुळात आरक्षणाची मर्यादा 50 टक्के आहे. त्यामुळे ही मर्यादा 83 पंचायत समित्या, 17 जिल्हा परिषदा, 57 नगरपालिका आणि 2 महापालिका अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये ओलांडण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. या संदर्भात ही सुनावणी होती. राज्य सरकारने त्यांच्या सोयीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ लावला आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी (इतर मागास प्रवर्गासाठी) सरसकट 27 टक्के आरक्षण लागू केले.

अमरावती, अकोला जिल्ह्याने मर्यादा ओलाडली?

ओबीसी आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा वाढल्याचा मुद्दा मुख्यत्वे आदिवासीबहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 100 आरक्षण टक्के झाले आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्हा परिषदांमध्ये 60 ते 70 टक्के आहे. शिवाय गडचिरोली 78 टक्के, पालघरमध्ये 93 टक्के, धुळे 73 टक्के आणि नाशिक जिल्हा परिषदेत 72 टक्के आरक्षण लागू झाले आहे. ठाणे, नागपूर, नांदेड, वाशीम, हिंगोली, जळगाव, वर्धा तसेच बुलढाणा या 8 जिल्हा परिषदांमध्ये 51 ते 60 टक्के आरक्षण दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button