मनपातील 16.20 कोटींच्या कामांवर बी अ‍ॅण्ड सीचा ताबा

मनपा बांधकाम विभागाकडे दुर्लक्ष?

अमरावती /19 नोव्हेंबर – अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या 16.20 कोटी रुपयांच्या विकास निधीचे सर्व कामकाज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (बी अ‍ॅण्ड सी) वर्ग करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांच्या सूचनेनुसार ही रक्कम बी अ‍ॅण्ड सी विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे आता मनपा क्षेत्रातील विकासकामे प्रत्यक्ष मनपा निर्माण विभागाऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. या निर्णयामुळे मनपा निर्माण विभागाच्या कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राप्त माहितीनुसार, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 10 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यास पत्र पाठवून पालकमंत्र्यांनी निर्देशित केलेल्या कामांसाठी निधी हस्तांतरित केल्याचे कळवले आहे. तसेच 2025-26 या आर्थिक वर्षातील वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कामांचे नियोजन बी अ‍ॅण्ड सी विभागाने नोडल एजन्सी म्हणून करावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. यासोबतच विकासकामांची यादी आणि आवश्यक कागदपत्रेही बी अ‍ॅण्ड सीकडे मनपा प्रशासनाने पाठविली आहेत. मनपा आयुक्तांनी बजेट पत्रके तयार करून मनपाकडे सादर करण्याचे निर्देशही बी अ‍ॅण्ड सीला दिले आहेत. मनपाच्या निर्माण विभागाने गत काही वर्षांत राजापेठ उड्डाणपूल, रस्त्याचे मजबुतीकरण, ड्रेनेज प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या कामांची अंमलबजावणी केली असताना, अचानकपणे या विभागाला बायपास करून कामे बी अ‍ॅण्ड सी विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न शहरात चर्चेत आहे. मनपा निर्माण विभागावर पालकमंत्र्यांचा अविश्वास व्यक्त झाला की काय, अशीही चर्चा होत आहे. अनेक जनप्रतिनिधींच्या सूचनेनुसार निधीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती असून, हे नियोजन आगामी मनपा निवडणुकांच्या दृष्टीने केले असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, या निधीतून कोणत्या प्रभागांसाठी कोणती कामे करण्यात येणार आहेत, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. फक्त विविध पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या निधी वाटपाची प्राथमिक माहिती मनपाला प्राप्त झाली आहे. भूमिगत गटर योजना, रस्ते दुरुस्ती, सिमेंट रस्ते, जलनिकासीसारख्या मूलभूत सेवांवर निधी खर्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु कामांची प्रत्यक्ष यादी अद्यापही गुप्त ठेवण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने जिल्हाधिकारी आशीष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आणि बी अ‍ॅण्ड सी विभागातील उच्च अधिकार्‍यांना निधी हस्तांतरणाची औपचारिक माहिती दिली आहे. मात्र, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एका विभागातून दुसर्‍या विभागाकडे इतक्या मोठ्या निधीचे थेट हस्तांतरण करण्यामागील प्रक्रियाही अनेकांना प्रश्नचिन्हास्पद वाटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार काले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूर 16.20 कोटी रुपयांपैकी दीड कोटी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केली जाणार असून, उर्वरित सर्व कामे बी अ‍ॅण्ड सी विभाग नोडल एजन्सी म्हणून हाकणार आहे. निधीचे नियोजन हे पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी पाठवलेल्या यादीवर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडीमुळे अमरावती मनपाच्या निर्माण विभागाला पूर्णपणे वळसा घालून विकासकामांचा ताबा बी अ‍ॅण्ड सी विभागाकडे देण्यामागील कारणांबद्दल शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे राजकीय अर्थही वेगवेगळ्या स्तरावर काढले जात आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button