अखेरच्या दिवशी अर्जांचे ढीग; राजकीय गणिते बदलणार
27 अध्यक्ष व 1821 सदस्य मैदानात; जिल्ह्यात निवडणुकीचा पारा चढला

अमरावती /17 नोव्हेंबर : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025 साठी नामांकनाचा अखेरचा दिवस जिल्ह्यात गजबजलेला ठरला. अध्यक्षपदासाठी 127 आणि सदस्यपदासाठी 1,821 असे एकूण 1,948 अर्ज दाखल झाले. सकाळपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या रॅल्या, वाहनांचे तांडे, घोषणाबाजी आणि गर्दीमुळे निवडणूक कार्यालयांभोवती दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. अंतिम दिवशी अध्यक्षपदासाठी 79 आणि सदस्यपदासाठी 712 अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील प्रमुख नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये दाखल झालेल्या अर्जांमध्ये अचलपूर येथे अध्यक्षपदासाठी 22 आणि सदस्यपदासाठी 374, अंजनगाव सुर्जी येथे अध्यक्ष 14 व सदस्य 309, तर दर्यापूरमध्ये अध्यक्ष 7 व सदस्य 139 अर्ज दाखल झाले. वरुड येथे अध्यक्ष 14 आणि सदस्य 155, चांदूर रेल्वेत 6 आणि 109, चिखलदर्यात 5 आणि 59, चांदूर ेदवारी अर्ज प्राप्त झाले. मोर्शीत अध्यक्षपदासाठी 13 आणि सदस्यपदासाठी 182, शेंदुर्जना घाट येथे अध्यक्ष 6, नांदगाव खंडेश्वर येथे अध्यक्ष 11 व सदस्य 87, तर धारणी येथे अध्यक्ष 16 आणि सदस्य 130 अर्ज दाखल झाले. काही शहरांत सदस्यपदासाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्यानं तिढ्यातील आणि बहुकोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार वाहनांच्या ताफ्यासह नामांकनासाठी दाखल झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. ढोल-ताशे, फटाके आणि घोषणाबाजीमुळे काही वेळा पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला. कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दिवसभर अखंड सुरू होती.नामांकन दाखल प्रक्रियेनंतर आता अर्जांच्या छाननीला सुरुवात होणार असून पात्र-अपात्रतेनुसार काही ठिकाणी राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात निवडणूक वातावरण अधिक तापले असून पुढील काही दिवसांत प्रचार मोहीम वेग घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता खरी लढत – कोण उरणार, कोण बाद होणार?-नामांकन प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष छाननी आणि अंतिम यादीकडे.
अनेक शहरांत बहुकोनी लढतीची शक्यता तर काही ठिकाणी पक्षनिष्ठा, गटबाजी आणि बंडखोरीमुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काही दिवसांत अमरावती जिल्ह्यातील राजकारणाचा ‘तापमानमान’ आणखी चढणार, हे निश्चित.




