ओबीसी महिला व खुल्या प्रवर्गात बदलांमुळे राजकीय गणिते ढवळून निघाली

अकोला महापालिका आरक्षणात मोठा फेरबदल

* प्रभाग 3, 10 आणि 14 मध्ये ओबीसी महिलांचा मोठा प्रभाव

* अनेक प्रभागांचे समीकरण बदलले – उमेदवारांच्या मंथनाला वेग

अकोला /17 नोव्हेंबर – अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षण लॉटरीने आज शहरातील स्थानिक राजकारणात नवीन खळबळ उडवली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या वर्षीची आरक्षण रचना जाहीर करण्यात आली असून विशेषत: ओबीसी महिला आरक्षण आणि सर्वसाधारण प्रवर्गातील बदल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बदलांमुळे अनेक संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले असून आगामी निवडणुकीच्या तयारीला नवे वळण मिळाले आहे. नवीन आरक्षणानुसार प्रभाग 3 (ब), 10 (अ) आणि 14 (ब) या तीन जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या आहेत. या प्रभागांमध्ये आधी सर्वसाधारण किंवा इतर प्रवर्गाचे आरक्षण होते. त्यामुळे या भागातील राजकीय कार्यकर्त्या महिलांना अचानक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रभाग 14 मधील क भागावरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून ते खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रभागातील विद्यमान महिला इच्छुकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आधीपासून तयारी करत असलेल्या महिलांचे राजकीय समीकरण ढासळण्याची शक्यता आहे. नवीन आरक्षणानुसार प्रभाग 1 – ‘अ’ भाग ओबीसीसाठी राखीव, तर ‘क’ भाग खुल्या प्रवर्गासाठी कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे या प्रभागात ओबीसी समुदायातील नेतृत्वासाठी नवी दारे उघडली आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button