महिला उमेदवारांचा दबदबा; चौफेर लढतींनी वातावरण तापलं

अचलपूरात अर्ज प्रक्रिया गाजली !

अखेरच्या दिवशी 829 सदस्य, 54 नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल

अचलपूर /17 नोव्हेंबर – अचलपूर महानगरपालिका नसली तरी निवडणूक मात्र महानगरे लाजवतील अशा धडाक्यात उमेदवारी अर्जाचा अंतिम दिवस अचलपूर-परतवाडा शहरात अक्षरशः राजकीय महोत्सवासारखा रंगून गेला. पहाटेपासूनच प्रत्येक रस्त्यावर पक्षांचे झेंडे, वाहनाचे ताफे, ढोल-ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात संपूर्ण शहर निवडणुकीच्या तालावर थिरकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी नगराध्यक्षपदासाठी एकूण 54 अर्ज नोंदले गेल्याची अधिकृत माहिती मिळाली. सदस्यपदाच्या निवडणुकीत यंदा प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अखेरच्या आकडेवारीनुसार 829 अर्ज दाखल झाले असून अनेक प्रभागांत तिनकोनी-चौफेर लढतीची शक्यता अधिक बळकट झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), प्रहार जनशक्ती, मनसे, एमआयएम तसेच असंख्य अपक्षांनी ठिकठिकाणी मिरवणुका, मोटारफेर्‍या आणि शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. या सार्‍या गदारोळामुळे नगरपालिका परिसर दिवसभर रणांगणासारखा धुमसत राहिला. शिवसेनेच्या उबाठा गटाने ज्येष्ठ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमालिका वाहून ‘शिवगर्जना’च्या आरोळ्यांत अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी चौक दुमदुमून गेला. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते फटाके, ढोलताशे आणि भगवे ताफे घेऊन दिमाखात नगरपालिका कार्यालयात दाखल झाले. काही उमेदवारांनी देवस्थानात माथा टेकवत, हात जोडून पारंपरिक पद्धतीने अर्ज दाखल करत परिसरात धार्मिक रंगतही निर्माण केली. आजच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी महिलांचा जबरदस्त उत्साह अनुभवायला मिळाला. आज अर्ज दाखल करणार्‍या प्रमुख महिला उमेदवारांमध्ये राधिका अरुण घोटकर, सुवेता चेतन शर्मा, रूपाली अभय माथने, ममता राजेश संडे वाले, रेखा जियालाल गडरेल, शबाना बानो गुल हुसेन, तेहमीना नाज मोहम्मद शकीर हुसेन, दिपाली कुंदन यादव या समाविष्ट आहेत. दिवसभरातील गदारोळानंतर नगराध्यक्षपदासाठी एकूण 54 अर्ज नोंदले गेल्याची अधिकृत माहिती मिळाली. सदस्यपदाच्या निवडणुकीत यंदा प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार 829 अर्ज दाखल झाले असून अनेक प्रभागांत तिनकोनी-चौफेर लढतीची शक्यता अधिक बळकट झाली आहे. नगरपालिका कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावर सकाळपासून रात्रीपर्यंत सतत गर्दीचे वलय होते. फक्त उमेदवार, सूचक आणि अनुमोदकांनाच आत प्रवेश दिल्याने कार्यकर्त्यांनी बाहेरच घोषणा, सेल्फी, उत्सव आणि जल्लोष चालू ठेवला. त्यामुळे परिसरात अनेकदा वाहनांची कोंडी झाली. रस्त्यातून निघणार्‍या वाहनांना कसरत करत पुढे जावे लागत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा गाजत पार पडला आहे. आता सर्वांचे लक्ष मागे घेण्याच्या टप्प्याकडे लागले आहे. कोणता उमेदवार कोणत्या प्रभागातून माघार घेतो, कोण कोणाच्या विरोधात उभा राहतो, कोणत्या प्रभागात कोणते नवे समीकरण उभे राहते-याचा उत्सुकतेने शोध घेत राजकीय वर्तुळाचे गणित पुन्हा तयार होऊ लागले आहे. आगामी काही दिवसांत अचलपूर-परतवाडा राजकारणात आणखी नाट्यमय वळणे दिसतील, अशी चर्चा राजकीय पातळीवर रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button