अजित पवारांच्या लेटरहेडचा गैरवापर
बनावट पत्राने एक कोटींची मागणी

* जिल्हा नियोजन अधिकार्याची पोलीस ठाण्यात तक्रार
बीड /30 ऑक्टोबर – बीडमध्ये काहीही होऊ शकते असे म्हटले जाते, त्याची प्रचिती आता जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्री, आमदार, खासदार याचे लेटरपॅड आणि बनावट स्वाक्षरी करुन निधी उकळण्यात आला किंवा मंजूर करुन घेण्यात आला अशा घटना समोर आल्या आहेत. असाच प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बनावट लेटरपॅड आणि बनावट स्वाक्षरीचा वापर निधी साठी करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट सही करुन बीड जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपयांची विकासकामे सुचवण्यात आली. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याच नावाने हा धक्कादायक प्रकार घडल्याने पुन्हा एकदा बीडमधील प्रशासनाच्या कारभाराची चर्चा होत आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक वाघमारे यांनी जिल्हा नियोजन समिती कार्यालयात अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे पत्र दाखवत नियोजन समितीच्या बैठकीत लहामेवाडी गावातील विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी केली होती. 10 विकास कामांसाठी बनवाट सहीचा वापर-वाघमारे यांनी लहामेवाडी या गावातील 10 कामांचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये गावातील स्ट्रिट लाईट खांब, एलईडी लाईट, हायमॉक्स, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ते, नळकांडी पूल या कामांचा समवेश होता. एकूण दहा कामांसाठी 10 लाख रुपयांची तरतूद दाखवण्यात आली होती. मात्र या पत्रावरील सही संशयास्पद वाटल्यामुळे जिल्हा नियोजन समितीतीच्या अधिकार्यांनी अजित पवार यांच्या कार्यालयाकडून या स्वाक्षरीची पडताळणी करुन घेतली. तेव्हा स्वाक्षरीबद्दल शंका उत्पन्न करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार बनावट असल्याचे उघड झाले आणि अशोक वाघमारे यांच्याविरुद्ध शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




