कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून 1,150 जादा एसटी बस सोडणार

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई /27 ऑक्टोबर : यावर्षी 2 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्यभरातून 1,150 पेक्षा जास्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘चंद्रभागा’ या यात्रा बसस्थानकावरून 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बसस्थानकावर 17 फलाट असून सुमारे एक हजार बस लावण्याची सुसज्ज वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकात केली आहे.

प्रत्यक्ष यात्रेच्या दिवशी बसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चंद्रभागा बसस्थानकावर 120 पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ झालेली वाहने बिघाडल्यास ती दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात असतील. गरोदर व स्तनदा महिलांसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्षाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. गाव ते पंढरपूर थेट सेवा-यात्रा कालावधीत 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी येता-जाता आपल्या गावातून गट आरक्षण करण्याचे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मागील वर्षी कार्तिकी यात्रेमध्ये एसटीने 1,055 जादा बसच्या माध्यमातून जवळजवळ 3 लाख 72 हजार भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली होती आणि त्याद्वारे सुमारे 6 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. यावर्षी देखील लाखो भाविकांची सुरक्षित ने-आण करण्यासाठी एसटीचे हजारो कर्मचारी रात्रदिवस सेवेत तत्पर राहतील, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button