आरोपीच्या अटकेसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल

अश्लील व्हिडिओ कांडाने संतापाचा स्फोट

अचलपूर /13एप्रिल– परतवाडा शहरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण शहर हादरून गेले असून नागरिकांच्या संतापाचा जणू ज्वालामुखीच फुटला आहे. या संतप्त वातावरणात आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला, पुरुष, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी परतवाडा पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक देत आरोपीला तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी केली. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओ क्लिप्समुळे परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपीने अल्पवयीन मुली, महिला यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर त्या कृत्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या अमानुष कृत्यामुळे विविध समाजघटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विशेषतः महिलांमध्ये संताप उसळला आहे. आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे या मागणीसाठी शेकडो महिला आक्रमक झाल्याचे चित्र पोलीस ठाण्यात दिसून आले. काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास आमदार प्रवीण तायडे यांच्या आरोपीच्या अटकेसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल!-नेतृत्वाखाली नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. यावेळी आमदार तायडे स्वतः फिर्यादी होऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा इशारा दिला. निवेदनात आरोपीने शंभरहून अधिक महिला व अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुमारे 108 व्हिडिओ क्लिप्स तात्काळ हटवाव्यात, आरोपीविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सहकार्‍यांवरही कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जुळ्या शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण कायम आहे. निवेदन देताना आमदार प्रवीण तायडे यांच्यासह सुरेखा ठाकरे, पद्मिनी बेंडे, दिलीप आस्वामी, सुरेंद्र तांबे तसेच , रुपेश ढेपे, विशाल कागद, सतीश शर्मा, प्रफुल बर्वे आदींसह शेकडो महिला-पुरुष उपस्थित होते.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे.

संबंधित बातम्या

Back to top button