काँग्रेसच्या नेत्याचा आगीत होरपळून मृत्यू

पत्नीसह दोन मुलींची प्रकृती गंभीर

 * इंदौर शहरात अग्नितांडव, स्वयंपाकघरात लागलेल्या आगीने दुर्घटना

इंदौर /23 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील इंदौर शहरात आज (दि. 23) सकाळी अग्निदुरघटनेत कार शोरूमचे मालक आणि काँग्रेस नेते प्रवेश अग्रवाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहिती नुसार, आग स्वयंपाकघरात लागली आणि बघता बघता ती संपूर्ण घरात पसरली. हा अपघात इंदौरच्या लसूडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौम्या मोटर्सच्या वर असलेल्या पेंट हाऊसमध्ये घडला. प्रवेश अग्रवाल हे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचे निकटवर्तीय होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात पोहोचवले. तिथे डॉक्टरांनी प्रवेश अग्रवाल यांना मृत घोषित केले.

प्रवेश यांची पत्नी रेखा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांची 14 वर्षांची मुलगी सौम्या आणि 12 वर्षांची मायरा याही जखमी झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमल नाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “इंदौरमध्ये आग लागल्याच्या दुर्दैवी घटनेत काँग्रेस नेते प्रवेश अग्रवाल यांच्या निधनाची आणि त्यांच्या पत्नीच्या गंभीर प्रकृतीची बातमी ऐकून खूप दुःख झाले. अग्रवाल हे काँग्रेसचे सच्चे शिपाई होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबातील इतर सदस्य लवकर बरे व्हावेत, ही कामना.”

सेंट्रल लॉक जाम झाल्याने गुदमरुन मृत्यू

प्रवेश अग्रवाल यांच्या घरातील पूजा कक्षातील ‘अखंड ज्योत’ (सलग तेवणारा दिवा) मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यानंतर, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणालीमुळे सेंट्रल लॉक जाम झाला, ज्यामुळे प्रवेश आणि त्यांच्या कुटुंबाला बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली. धुरामुळे प्रवेश अग्रवाल गुदमरले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. आग लागल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला वाचवले, पण स्वतःचा जीव वाचवू शकले नाहीत. प्रवेश अग्रवाल यांचे मध्यप्रदेशात ‘सौम्या मोटर्स’ नावाचे अनेक शोरूम आहेत आणि ते माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी ‘नर्मदा युवा सेना’ नावाची संघटना देखील स्थापन केली होती. आगीच्या घटनेवेळी सुरक्षारक्षक (गार्ड) उपस्थित होते, पण मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. प्रवेश अग्रवाल हे ग्वाल्हेरचे रहिवासी होते, आणि त्यांचा भाऊ मुकेश अग्रवाल व कुटुंबातील इतर सदस्यही तिथेच राहतात. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही अनेक ऑटोमोबाईल एजन्सी चालवत होते आणि देवास परिसरात राजकीयदृष्ट्या सक्रिय होते.

संबंधित बातम्या

Back to top button