आज हनुमान गढीवर भव्य दीपोत्सवाचे आयोजन
7 फुटाचा अखंड दिवा करणार प्रज्वलीत, अयोध्येतील श्रीराम मंदीरातून येत आहे ज्योत

* विविध साधु संतासह मान्यवरांची उपस्थिती
* पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती
अमरावती/ 18 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त 100 सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे प्रसिद्ध समाजसेवक, भाजपाचे कार्यकर्ते आणि अभाविपचे मार्गदर्शक चंद्रकुमार जाजोदीया यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या कार्यक्रमांचा पहिला उपक्रम रविवारी छत्री तलावाजवळील हनुमानगढी येथे दीपोत्सवाच्या स्वरूपात पार पडणार आहे.
सनातन धर्माला जगभर पोहोचविण्याचे आणि व्यक्ती निर्माणाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा प्रवास अद्भुत असल्याचे त्यांनी नमूद केले. या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त पुढील वर्षभरात 100 विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवा कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पारधी बेड्यांवरील 10 कार्यक्रम, गरीब वस्त्यांमधील 10 सामाजिक उपक्रम, 10 वृक्षारोपण मोहिमा, 10 भागवत कथा, तसेच नेत्रदान, नेत्रप्रत्यारोपण, रक्तदान आणि देशभक्तीपर 10 कार्यक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय, संघाशी संलग्न विविध संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षांचा प्रवास दर्शविणारी प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, संत संमेलन, सनातन धर्मासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार आणि हिंदूराष्ट्र अभियानही राबविले जाणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये ब्रह्माकुमारी सितादिदी, राजेश्वर माउली महाराज, कारंजेकर बाबा, शक्ती महाराज, सागर देशमुख महाराज आणि राजेशलाल मोरडिया यांसह अनेक संत मंडळी सहभागी होणार आहेत. तसेच भाजपा, प्रज्ञा प्रबोधिनी, वनबंधू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आर्ट ऑफ लिव्हिंग, श्रीराम नवमी शोभायात्रा समिती, पतंजली परिवार, गुरूदेव सेवा मंडळ, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदू गौरक्षा दल यांसारख्या संस्थाही या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणार असल्याची माहिती चंद्रकुमार जाजोदीया यांनी दिली.
* रात्री भव्य आतिषबाजी
दिपावलीच्या शुभ पर्वावर हनुमान चालिसा चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने हनुमान गढी येथे रविवार 19 ऑक्टोबर रोजी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. येथे 111 फुट उंच हनुमानमर्ती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येच्या दीपोत्सव साजरा झाला होता. हा केवळ घरी परतण्याचा उत्सव नव्हता, तर तो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव होता. तीच परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रविवारी सांयकाळी 6 वाजता श्रीराम मंदिर अयोध्येतून आणलेली ज्योत 7 फुट दिवामध्ये लावून आरती होईल. सांयकाळी 7.30 वाजतापासून दीपोत्सव सुरू होईल. रात्री 9 वाजता भव्य आतषबाजी होईल. नागरीकांनी आपल्या परिवाराच्या सुखशांती, आरोग्यासाठी व उज्वल भविष्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने अखंड दीपज्योत लावाली.




