इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा

उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी

* मतदार यादीतील घोळावरून विरोधक आक्रमक निवडणूक आयोगाच्या पारदर्शकर्तेवर संशय

मुंबई /15 ऑक्टोबर – राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी थेट निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली आहे, मात्र विरोधक निवडणूक आयोगाविरोधात कसे आक्रमक झालेत आणि मतदारयाद्यांची विरोधकांनी चिरफाड केली हेही उघड झाले आहे. मतदारयाद्यातील घोळावरून विरोधकांनी सलग दुसर्‍या दिवशी निवडणूक आयोगाला खिंडीत घेरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीत मोठा घोळ समोर आणला आहे आणि तीच मतदारयादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याने जयंत पाटलांनी थेट मतदारयादीतील गोंधळ समोर आणून मतदारयाद्यांची पोलखोल केली आहे. तर वेळेत तक्रार केल्यावरही आयोगाने दखल घेतली नसल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला आहे. एवढंच नव्हे तर भाजपला मदतीच्या चोरवाटा बंद केल्यानं आयोग उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं, तर सदोष निवडणूक घेण्याऐवजी थेट सिलेक्शन करून टाका, असा टोलाही ठाकरेंनी लगावला आहे. महाविकास आघाडीने मनसे आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांसोबत शिष्टमंडळ तयार करून निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे, मंगळवारी (14 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवारीदेखील (15 ऑक्टोबर) शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत नेमकं काय घडलं, तसेच निवडणूक आयोगाच्या उत्तरांनी शिष्टमंडळाचे समाधान झाले का, याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मोठी मागणी केली आणि लोकशाहीसाठी सर्व पक्ष एकत्र आले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, निवडणूक अधिकारी नव्हेत तर कटपुतली बाहुल्या आहेत, ज्यांना वरून आदेश मिळतात आणि त्यामुळे योग्य उत्तर मिळाले नाही. लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही गाजू देणार नाही; मतदार यांद्यांमध्ये घोळ झाला असून लोकशाहीचा खेळखंडोबा सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांची केस सुमोटो घेतली होती, तशीच मनुष्य प्राण्यांची ही केस घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटले की, मतदारयादीतील घोळ दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, तसेच जसा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो, तसा सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

* तर निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा

मतदार यादी वापरली जाणार आहे. या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, त्या मतदार याद्या आम्हाला दाखवल्या जात नाही. जर राजकीय पक्षांना मतदार याद्या दिल्या जात नाही, तर सामान्य मतदाराला त्याचे नाव आहे की नाही, हे कसे कळणार, असा सवाल करत मतदार याद्या अद्ययावत करा, त्यात सुधारणा करुनच निवडणूका घ्या. निवडणुकीची तारीख पुढे ढकला, सर्वोच्च न्यायालयाला तशी विनंती करा, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना सांगत निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा, अशी थेट मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button