इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत
मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई /15 ऑक्टोबर : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटींचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली आणि मतदार याद्यांतील डुप्लिकेट व चुकीच्या नोंदींमुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतदार याद्यांतील गोंधळ स्पष्ट करणारी उदाहरणे सुद्धा देण्यात आली. या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत,” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आणि आरोप केला की, निवडणुकीत पराभव झाल्यास आधीच त्याचं पर्सेप्शन तयार करण्यासाठी हे नाटक सुरू आहे. फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रियेतील यंत्रणांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. विरोधक निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे गेले, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळा आयोग आहे, ज्याचे प्रमुख दिनेश वाघमारे आहेत. विरोधकांना काय मागायचे हेच कळत नव्हते, हे त्यांनी ‘फियास्को’ म्हणून ठरवले. मतदार याद्यांमध्ये असलेल्या त्रुटींवर सरकारकडून सहकार्याची भूमिका असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आणि सांगितलं की, “मतदार याद्यांमध्ये सुधारणा हवी असेल तर आमचाही पूर्ण पाठिंबा आहे. निवडणुका पारदर्शक आणि योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत.” मात्र, त्यांनी विरोधकांवर आरोप करताना सांगितलं की, विरोधक फक्त नॅरेटिव्ह तयार करण्याचं काम करत आहेत, प्रत्यक्ष काही करीत नाहीत. मतदार याद्यांमधील गोंधळ हा नवीन प्रकरण नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली समस्या असल्याचं फडणवीस म्हणाले आणि 20 वर्षांपासून डुप्लिकेट नावे अस्तित्वात असून त्यावर विरोधकांनी काहीही केलं नाही, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी फडणवीस यांनी विरोधकांना सल्ला दिला की, पराभव स्वीकारा, जनतेसमोर जा आणि निवडणुकीला सामोरे जा; संविधान, नियम आणि संस्थांवर दुर्लक्ष करून केवळ आरोप आणि संभ्रम निर्माण करण्याचं काम बंद करा. राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच निवडणूक आयोग पुढे काय निर्णय घेणार, याकडे राज्याचं लक्ष लागून आहे, आणि विरोधक व सत्ताधार्यांमध्ये सुरू झालेलं शाब्दिक युद्ध आगामी निवडणुकांच्या रंगतदार राजकारणाची नांदी ठरत आहे.




