थर्मल पॉवर मचान कोसळला, 9 मजुरांचा मृत्यू
चेन्नईतील वीज प्रकल्पात दुर्घटना

नवी दिल्ली/ 30 सप्टेंबर – तामिळनाडूची राजधानी चेन्नईत मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. एन्नोर औष्णिक वीज प्रकल्पातील एका निर्माणाधीन साइटवर मचान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अनेक मजूर दबले गेले. याची माहिती मिळताच बचावत पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेत 9 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि घटनास्थळी मदतीसाठी धावाधाव सुरु आहे.
एन्नोर औष्णिक वीज प्रकल्प हा चेन्नईतील कोसळ्यावर चालणारा वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाची 1970 रोजी स्थापना झाली होती आणि त्याची क्षमता 450 मेगावॉट आहे. संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या विस्तारासाठी बांधकाम सुरु आहे आणि या विस्ताराचं बांधकाम सप्टेंबर 2026 रोजी पूर्ण होईल. वीज प्रकल्पाच्या नवीन जागेवर कामगार मचान बांधण्याचे काम करत होते. त्याचवेळी मचान कोसळल्यामुळे कामगार 30 फूटांवरून खाली कोसळले. या घटनेनंतर मोठा आवाज झाला आणि इतर कामगार मदतीला धावले. त्यातील काहींनी वीज प्रकल्पातील अधिकार्यांना घटनेची माहिती दिली.




