शेतकरी अडचणीत, दिवाळीपूर्वी मदतीचा सरकारचा निर्धार

पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

* पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकर्‍यांच्या बांधावर

नागपूर/ 29 सप्टेंबर – राज्यात अवकाळी पावसामुळे तब्बल 50 लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती मागील 50 वर्षांतील सर्वात मोठी आपत्ती मानली जात आहे. सरकार शेतकर्‍यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणार आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून दिवाळीपूर्वी सरकार मदत करण्याचा निर्धार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील कळमेेशर तालुक्यातील मौजा दाढेरा, तिडंगी, तेलगाव, नांदा गोमुख या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेट देऊन शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील अतिवृष्टीमुळे तब्बल 60 हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी व संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्र्याची संपूर्ण झाडे उन्मळून पडली असून शेतकरी बिकट परिस्थितीत सापडला आहे. ऑगस्टमध्ये 25 लाख हेक्टर आणि सप्टेंबरमध्ये 22 लाख हेक्टरवर पंचनामे झाले असून, आतापर्यंत जवळपास 50 लाख हेक्टरवरील शेती नुकसानग्रस्त ठरली आहे. पंचनामे काटेकोरपणे व्हावेत यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पंचनामा ग्रामसभेत दाखवणे अनिवार्य केले असून अधिकारी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. सरकारकडे चुकीचे आकडे आले तर शेतकर्‍यांचे नुकसान होईल, त्यामुळे अधिकारी फिल्डवरच राहतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांसाठी दिवाळीपूर्वी मदतीचे ओशासन असून, एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडून मदत दिली जात आहे. पाच तारखेनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील प्रमुख नेते मिळून शेतकर्‍यांना अधिक मदत देण्याचा निर्णय घेतील. दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना मदत देण्याचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकार्‍यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहू नये. नुकसान झालेल्या जमिनींचा पंचनामा करताना नियमांच्या पलीकडे जाऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा. हवामान बदल व जलनिसारण व्यवस्थेची गरज अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सांगितले. पावसाचे नियोजन नाले-जोड प्रकल्प आणि वॉटर ग्रिड पद्धतीने केले पाहिजे. व्हीएनआयटी कडून सर्व्हे करून शहरातील जलनिसारण, मलनिसारणाची नव्याने आखणी करावी लागेल.

संबंधित बातम्या

Back to top button