राज्यातील 32 लाख शेतकर्यांना दिलासा
बाधित शेतकर्यांना 2,215 कोटींची मदत मंजूर

* पैसे 8-10 दिवसांत बँक खात्यात जमा होणार
* सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे करावे
* मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 निर्णय
मुंबई /23 सप्टेंबर : राज्यातील मराठवाड्याला आणि विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या या जिल्ह्यातील शेतकर्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. शेतकर्यांचे झालेले नुकसान पाहता त्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई देऊ, असे ओशासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (23 सप्टेंबर) सकाळीच सांगितले होते. यानंतर आता राज्य सरकारने जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकर्यांना कोटींची मदत जाहीर केली असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर झाला आहे. तसेच बुधवारपासून (24 सप्टेंबर) सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करावे, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतीपिकांच्या नुकसाना पोटी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देतेाना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात 70 लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झालं आहे आणि यासाठी 2,215 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेशही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकर्यांना 1,339 कोटी रुपयांची मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात राज्य सरकारकडून आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच सर्व मंत्र्यांना बुधवारपासून (24 सप्टेंबर) नुकसानग्रस्त भागाचे दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौर्यावर जाणार असून ते तेथील पूरपरिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.




