आजपासून नवे जीएसटी दर लागू, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, दिला स्वदेशीचा नारा

देशभरात नवरात्रोत्सवाबरोबरच ‘बचत उत्सवास’ प्रारंभ

*  भारतीयांचे वर्षाला अडीच लाख कोटी वाचणार

* घर, टीव्ही, फ्रीज, कार यांसह अनेक वस्तू स्वस्त होणार

* गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी, तरुण वर्गाला मोठा फायदा

नवी दिल्ली/21 सप्टेंबर  : देशात उद्या सकाळपासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाचा देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी 5 वाजता भारतीयांना संबोधित करत या नव्या जीएसटी दराविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या आदल्या दिवशी नवा नारा दिलाय. “गर्वाने सांगा आम्ही स्वदेशी आहोत,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच यावेळी भारतीयांचे वर्षाला अडीच लाख कोटी वाचणार असल्याचेही मोदींनी नमूद केले. नवरात्रोत्सवाचा शुभारंभ उद्यापासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळपासून नवा जीएसटी कायदा लागू होईल. भारतात उद्यापासून जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. जीएसटी बचत उत्सवातून मोठी बचत होईल आणि तुम्हाला आवडीच्या वस्तू खरेदी करता येतील. देशातील अनेकांना बचत उत्सवाचा फायदा होईल. या सणामुळे सर्वांचं तोंड गोड होणार आहे आणि अनेक कुटुंब आनंदीत होणार आहेत. देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटी दरांची आणि बचत उत्सवाच्या शुभेच्छा देतोय. तुम्ही मला 2014 मध्ये संधी दिल्यावर देशहितासाठी जीएसटीला प्राथमिकता दिली, प्रत्येकासोबत चर्चा केली, प्रत्येक राज्याची अडचण दूर केली आणि प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शोधले. सर्वांना सोबत घेत जीएसटी शक्य झालं. हे केंद्र आणि राज्याच्या प्रयत्नांचे यश आहे. यामध्ये देश वेगवेगळ्या टॅक्समधून मुक्त झाला आणि देशात वन नेशन वन टॅक्सचं स्वप्न पूर्ण झालं. बदल ही प्रक्रिया चालूच राहते आणि देशाच्या गरजेनुसार त्यात बदल केला जातो. देशाची सध्याची परिस्थिती आणि स्वप्नांना पाहून हे लागू होत आहे. देशात आता फक्त 5 आणि 18 हे दोन टॅक्स राहणार आहेत. दैनंदिन वापरातील वस्तू, खाण्यापिण्याच्या गोष्टी, साबण, पेन, विमा यासारख्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. ज्या सामानावर आधी 12 टक्के टॅक्स होता, त्यामधील 99 टक्के वस्तूंवर आता फक्त 5 टक्के स्लॅबमध्ये कर आकारला जाईल. मागील 11 वर्षात देशात 25 कोटी लोकांनी गरिबीला हरवलं असून मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर येत मध्यमवर्गात आले आहेत. या सर्वांचे आपली स्वतःची स्वप्ने आहेत. या वर्षी सरकारने 12 लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करत भेट दिली, ज्यामुळे मध्यमवर्गीयांच्या जीवनात मोठा बदल झाला.

*  मेड इन इंडियाचा निर्धार

आज आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी विदेशी आहेत, ज्याची आपल्याला जाणीवही नसते. मात्र आता पुन्हा एकदा आपल्याला स्वदेशीचा नारा द्यावा लागेल. “मी स्वदेशात तयार झालेल्या वस्तूच वापरतो,” असे आपल्या अभिमानाने सांगावे लागेल. तरच देशातील लघू, कुटीर आणि सुक्ष्म उद्योगांना चालना मिळेल आणि देशातील प्रत्येक राज्याचा विकास होईल, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी मेड इन इंडियाचा निर्धार केला.

*  99 टक्के वस्तूंवर केवळ 5 टक्के जीएसटी

जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्याने देशातील 99 टक्के वस्तूंवर केवळ 5 टक्केच कर आकारला जाणार आहे. यामुळे दैनंदिन वस्तू खरेदी करण्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. या कर सुधारणेचा देशातील सर्वच घटकांना लाभ होणार आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतीलच, त्याचबरोबर टीव्ही, एसी, कार, इलेक्ट्रिक स्कुटर यांच्यावरील कर कमी झाल्याने मध्यमवर्गियांना फायदा होणार आहे. आता ख-या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. “आम्ही एक राष्ट्र, एक कर” याचे वचन दिले होते, ते आज साकारले आहे.

*  भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मोठे पाऊल

जीएसटी सुधारणेचा मोठा लाभ लघू, कुटीर आणि सुक्ष्म उद्योगांना मिळणार आहे. आता भारतातील निर्मिती आणि भारतातच विक्री हे चक्र वेगाने फिरणार आहे. नागरिक “देवो भव:” हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहेत. जीएसटी सुधारणा करण्याचा निर्णय देशाला आत्मनिर्भर करण्यासाठीचे मोठे पाऊल आहे.

संबंधित बातम्या

Back to top button