पती-पत्नीच्या वादात आईचा चिमुकल्याला नदीत फेकण्याचा प्रयत्न
तिवसा शहरातील पिंगळाई नदीच्या पुलावरील धक्कादायक घटना

* पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
अमरावती /19 सटेंबर : तिवसा शहरातील पिंगळाई नदीच्या पुलावर शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेने लहान मुलाला घेऊन पुलावर येत मोठ्याने बडबडत राग व्यक्त केला. तिने मुलाला पुलाच्या कठड्यावर उभे केले आणि काही क्षणातच त्याचा शर्ट पकडून त्याला कठड्यावर लटकवले. या प्रकाराने आसपासच्या लोकांना धक्का बसला. जागरूक नागरिकांनी हा प्रसंग पाहताच लगेच धाव घेतली आणि महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच तणाव आणखी वाढला कारण महिला मुलाला नदीत फेकून देईल की काय, अशी भीती सर्वांना वाटत होती. पोलिसांनी आणि नागरिकांनी जवळपास वीस मिनिटे प्रयत्न करून शेवटी महिलेला समजावले आणि मुलाची सुटका करण्यात यश आले.
प्राथमिक माहितीनुसार, या महिलेचे पतीसोबत सतत वाद होत होते आणि त्याला कंटाळून तिने रागाच्या भरात हे पाऊल उचलले. महिलेचे नाव समजू शकले नाही, पण तिच्या या कृतीमुळे दोन ते तीन वर्षांच्या मुलाचा जीव धोक्यात आला होता. या घटनेमुळे तिवसा शहरात खळबळ माजली. पती-पत्नींमध्ये वाद होणे ही सामान्य बाब असली तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे या प्रसंगातून स्पष्ट झाले. महिलेच्या रागाच्या भरात उचललेल्या पावलामुळे गंभीर दुर्घटना घडू शकली असती, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. तब्बल वीस मिनिटांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी महिलेची समजूत काढून तिला ताब्यात घेतले आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते.




