जिल्हा बँकेतील आनंद काळे प्रकरणी सह-निबंधकांचे निर्णायक पाऊल
प्राथमिक हरकती फेटाळल्या

-1 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी
-काळेंविरोधात 12 संचालकांच्या तक्रारी
अमरावती / 18 सप्टेंबर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सत्ताधारी गटातील संचालक आनंद काले यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीवरील वाद अधिक गडद झाला आहे. विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या न्यायपीठात मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत काळे यांनी मांडलेल्या सर्व प्राथमिक हरकती नामंजूर करण्यात आल्या. त्यामुळे आता येत्या 1 ऑक्टोबर रोजी होणार्या पुढील सुनावणीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले असून सहकार क्षेत्रातील सर्वांचे लक्ष त्या दिवशीच्या निर्णयाकडे लागले आहे.
बँकेचे विरोधी गटातील संचालक हरिभाऊ मोहोड आणि त्यांचे सहकारी असे एकूण 12 संचालकांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, संचालक आनंद काळे यांनी बँकेच्या हितांविरुद्ध मनमानी कारभार केला. नियम धाब्यावर बसवत प्रवास भत्त्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहारही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाच्या छायेत बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत काळे यांच्याकडून 1 लाख 72 हजार 855 रुपयांची वसुली करण्याचा ठरावही पारित झाला होता. मात्र ही रक्कम नियोजित मुदतीत न भरल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी मार्ग मोकळा झाला. त्यानुसार 30 जून 2025 रोजी काळे यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरच विरोधी संचालकांनी त्यांच्या विरोधात विभागीय सहनिबंधक आणि उच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी अपील दाखल केली.
गेल्या दोन महिन्यांपासून या अपीलवर सातत्याने सुनावणी सुरू होती. त्यात काळे यांनी आपल्या विरोधातील अपील फेटाळण्यात यावी, अशी मागणी करत काही प्राथमिक आक्षेप नोंदवले होते. मात्र विरोधी बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी त्यांच्या सर्व हरकती धुडकावून लावल्या. तसेच दोन्ही पक्षांना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता लेखी निवेदने आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
-अपात्रतेची शक्यता?
या घडामोडींमुळे आता काळे यांच्या संचालकपदावर अपात्रतेची तलवार लटकताना दिसत आहे. आगामी सुनावणीत त्यांच्यावरील आरोपांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यामुळे सहकार क्षेत्रच नव्हे तर राजकीय वर्तुळातही या खटल्याच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.




