मनपा निवडणूक : प्रभाग रचनेवरील 40 पैकी 30 आक्षेप निकाली
सुनावणी सुरू, जिल्हाधिकारी व आयुक्तांची उपस्थिती

अमरावती / 17 सप्टेंबर : अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप विभागरचनेवर नोंद झालेल्या आक्षेपांवरील सुनावणीची प्रक्रिया आज 17 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुरू झाली. एकूण 133 आक्षेपांपैकी पहिल्या दिवशी क्रमांक 1 ते 40 या 40 प्रकरणांची सुनावणी झाली. या सुनावणीसाठी स्वतः जिल्हाधिकारी आशीष येरेकर व मनपा आयुक्त सौम्या शर्मा प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकले.
आज सुनावणीत समाविष्ट केलेल्या 40 आक्षेपांपैकी 30 आक्षेपदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि त्यांच्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी व आयुक्तांनी विभागनिहाय नकाशे विशाल स्क्रीनवर पाहत तात्पुरता निकाल नोंदविला. तर 4 आक्षेपदार सुनावणीस हजरच झाले नाहीत. सुनावणी सुरू होण्यास विलंब झाल्याने 6 आक्षेपदार निराश होऊन परत गेले. त्यामुळे प्रत्यक्ष 30 आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली. तीन दिवस चालणार्या या सुनावणी प्रक्रियेत उद्या 18 सप्टेंबर रोजी आक्षेप क्रमांक 41 ते 90 या 50 प्रकरणांची सुनावणी होणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी शिल्लक 43 प्रकरणांवर सुनावणी होऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
सर्व आक्षेपांवरील सुनावणी व नोंदींचे एकत्रीकरण करून जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा प्रशासन यांचे संयुक्त शिफारशींसह अंतिम विभागरचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर आयोग अंतिम विभागरचना जाहीर करेल व मनपा निवडणुकीची अधिसूचना काढेल. आजच्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकारी आशीष येरेकर व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह नगरविकास विभागाचे आणि मनपा निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक आक्षेपाची बारकाईने विभागनिहाय नकाशे पडद्यावर दाखवत तपासणी करण्यात आली. नागरिकांची बाजू शांतपणे ऐकली गेली आणि प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली.




