शहरात डेंगूचे 5 सक्रिय रुग्ण, ग्रामीण भागात 21

8 महिन्यांत 201 नागरिकांना चिकनगुनिया

-पावसाळा संपताना एडीस मच्छरांचा वाढता त्रास
अमरावती / 12 सप्टेंबर : पावसाळा संपता-संपता एडीस मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे डेंगू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांतच तब्बल 26 डेंगू रुग्ण आढळले असून त्यात शहरातील पाच सक्रिय रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती अधिक गंभीर असून 21 जणांना डेंगू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मनपा आरोग्य विभाग व जिल्हा मलेरिया कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर क्षेत्रात संशयित लक्षणे दिसून आलेल्या 23 नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. त्यापैकी 5 जणांचा अहवाल डेंगू पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीण भागात तब्बल 124 जणांची रक्त तपासणी करून त्यापैकी 21 जण डेंगूग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. जानेवारी ते 10 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात एकूण 211 डेंगू रुग्ण नोंदले गेले असून सर्वांचा यशस्वी उपचार करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. केवळ शहरात या वर्षीपर्यंत डेंगू रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे.
डेंगू सोबतच चिकनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ दिसून येत आहे. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात 201 नागरिक चिकनगुनियाने ग्रस्त झाले. या काळात एकूण 1707 संशयित नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. अलीकडील आठ दिवसांत मात्र मनपा क्षेत्रात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु ग्रामीण भागात याच कालावधीत 124 संशयित नमुन्यांची तपासणी केली असता 15 जणांना चिकनगुनियाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
-आरोग्य विभागाची सतर्कता
डेंगू व चिकनगुनियासारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. घराभोवती पाणी साचू न देणे, डासप्रतिबंधक वापरणे, तसेच ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button