रेल्वेस्थानक हलवून नव्या मार्गाचा खंडेलवाल यांचा प्रस्ताव

प्रश्न राजकमल रेल्वे उड्डाणपूलाचा

-यश खोडके म्हणाले-प्रत्यक्षात काम अवघड
-खर्च व वेळ वाढणार, जमिनीचीही अडचण
-जुन्यालाच मजबुती देणे हाच ठोस पर्याय
अमरावती / 10 सप्टेंबर : अमरावती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला रेल्वे उड्डाणपुल अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवा अभियंता वेदांश निलेश खंडेलवाल यांनी स्थानिक प्रशासनासह विद्यमान व माजी लोकप्रतिनिधींसमोर एक अनोखा व वेगळा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे युवा नेते यश खोडके यांनी ही कल्पना उत्कृष्ट असल्याचे म्हटले. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे प्रत्यक्षात अत्यंत कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यश खोडके यांनी सांगितले की, खंडेलवाल यांच्या प्रस्तावात वापरण्यात येणारी बहुतांश जमीन विविध शासकीय खात्यांच्या ताब्यात आहे. अशा जमिनींचे हस्तांतरण सोपे नसते. केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याची मालकी असलेली जमीन इतर कोणत्याही विभागाला हस्तांतरित होत नाही. त्याचबरोबर, जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्वी महानगरपालिका व पोलीस विभागास दिलेली जमीनही जलपुरवठा टाकी व महावितरणाचे सब-स्टेशन उभारणीसाठी प्रस्तावित आहे. त्यामुळे अशा जमिनी प्रत्यक्षात वापरात आणणे जवळपास अशक्य आहे.
खोडके यांनी स्पष्ट केले की, विद्यमान अमरावती रेल्वे स्थानकावर गेल्या काही वर्षांत अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. अजूनही अत्याधुनिक सुविधांच्या दृष्टीने काम सुरूच आहे. अशा स्थितीत सध्याचे रेल्वे स्थानक बंद करून ते 700-800 मीटर पुढे नवे उभारणे वेळखाऊ आणि खर्चिक ठरेल. एवढ्या पैशांत नव्यानेच रेल्वे उड्डाणपुल उभारता येईल.
-तीन वर्षे वाहतूक व्यवस्थेत बदल नाही
खोडके यांनी निदर्शनास आणले की, उड्डाणपुल बंद झाल्यानंतर सुरुवातीला शहरात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, नागरिकांनी हळूहळू परिस्थिती स्वीकारली असून आता वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाली आहे. आगामी दोन-तीन वर्षे हीच व्यवस्था कायम राहील, कारण नवा उड्डाणपुल उभा करायचा झाला तरी किमान एवढाच कालावधी लागणार आहे.
-प्री-फॅब्रिकेटेड ब्लॉक्स व्यवहार्य
यश खोडके यांच्या मते, संपूर्ण उड्डाणपुल पाडून नवे बांधणे अव्यवहार्य ठरेल. कारण, या भागात व्यापारी व निवासी वस्ती असल्याने कामासाठी जागेची कमतरता आहे. त्यामुळे विद्यमान उड्डाणपुलातील जे भाग मजबूत आहेत, ते तसेच ठेवून मधल्या पट्ट्यांवर प्री-फॅब्रिकेटेड ब्लॉक्स बसवून उड्डाणपुलाला मजबुती देता येईल. हा पर्याय अधिक व्यवहार्य असल्याचे त्यांनी मत मांडले.

Back to top button