मेळघाटातील नरभक्षक वाघावर आज निर्णय होणार

खा. वानखेडे यांच्या पत्रावर विशेष बैठक

-पाच महिन्यांत सहा बळी
-राजकुमार पटेल यांचा ठाम इशारा
अमरावती / 10 सप्टेंबर : मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत सहा जणांचा बळी घेणार्‍या नरभक्षक वाघाच्या प्रश्नावर अखेर निर्णायक पाऊल उचलले जाणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्या पत्रावरून 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हरिसाल येथे विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत स्थानिक ग्रामस्थांनाही सहभागी करण्यात येणार असून, नरभक्षक वाघावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खोंगडा, कुलंगणा खुर्द व हरिसाल या गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाघामुळे नागरिक भयभीत आहेत. या सर्व गावातील ग्रामस्थांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीत पुढील कारवाईबाबत निर्णय होणार आहे. वनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांनी सांगितले की, आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, सर्व मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. याचबरोबर नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याबाबतही सविस्तर चर्चा होईल. वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजनांवरही बैठक केंद्रित राहणार आहे.
दरम्यान, माजी आमदार राजकुमार पटेल यांनी या प्रश्नावर सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त व्हावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे. यंदाच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास परवा म्हणजेच 12 तारखेपासून आंदोलन छेडण्याचा इशारा पटेल यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button