राजकमल पुलाला सेतूबंधन योजनेतून 300 कोटींचा निधी?
खासदार वानखडेंना गडकरींचे आश्वासन

-दिल्लीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा
अमरावती/ 9 सप्टेंबर : अमरावती शहराच्या दळणवळण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या नवनिर्माणाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहे. तब्बल 60 वर्षे जुना झालेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने 24 ऑगस्टपासून लोहमार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तो पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी पुलाच्या नवनिर्माणासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
नवी दिल्ली येथे खासदार वानखडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत लेखी निवेदन सादर केले. त्यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेतूबंधन योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार वानखडे यांनी दिली. या भेटीच्या वेळी खासदार कल्याण काळे व डॉ. शिवाजी कालगे हेही उपस्थित होते.
खासदार वानखडे यांनी सादर केलेल्या निवेदनात, पुल बंद झाल्याने नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी तातडीने नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्याची मागणी ठामपणे मांडली. या संदर्भात खासदार वानखडे यांनी सांगितले की, राजकमल रेल्वे उड्डाणपूल हा जिल्हा मार्गावरील पूल असल्याने सेतूबंधन योजनेतून निधी देण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. मात्र यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची औपचारिक प्रक्रिया अपेक्षित आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, राज्य सरकारकडे तातडीने प्रस्ताव सादर करून केंद्राकडून निधी मंजूर करून घेण्यात येईल.




