मनपा निवडणुकीत यंदा मतदारांची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक

14 वर्षांत दीड लाखांनी वाढ

-जनगणना न झाल्याने 2017 चेच आकडे आधार
अमरावती / 9 सप्टेंबर : अमरावती महानगरपालिकेच्या सातव्या सदनाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, मनपा प्रशासनाने नुकतीच प्राथमिक प्रभागरचना जाहीर केली आहे. प्रभागांतील समाविष्ट वस्त्या, चतुर्सीमा व प्रभागनिहाय जनसंख्येची माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ जाहीर करण्यात आली. त्यानुसार अमरावती मनपा क्षेत्राची एकूण जनसंख्या 6 लाख 47 हजार 57 इतकी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या जनसंख्येपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे 6 लाख 68 हजार मतदार या वेळी निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार अमरावती मनपा क्षेत्राची जनसंख्या 6 लाख 46 हजार 801 इतकी होती. त्यानंतर 2012 च्या मनपा निवडणुकीत मतदारसंख्या 5 लाख 17 हजार 338 होती. 2017 च्या निवडणुकीवेळी जनसंख्या 6 लाख 47 हजार 57 अशीच राहिली, तर मतदारसंख्या 5 लाख 72 हजार 648 नोंदविण्यात आली. यामध्ये 2 लाख 95 हजार 316 पुरुष, 2 लाख 77 हजार 304 महिला व 28 इतर मतदारांचा समावेश होता.
2022 मध्ये मनपा निवडणूक अपेक्षित होती. त्याआधी 2021 मध्ये राष्ट्रीय जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र, मार्च 2020 मध्ये कोविड संसर्ग व लॉकडाऊनमुळे जनगणना व निवडणुका दोन्ही प्रलंबित राहिल्या. त्यातच ओबीसी आरक्षण व प्रभागरचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे मनपा व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुन्हा मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मनपा प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार सर्वाधिक जनसंख्या प्रभाग क्र. 16 अलीम नगर-रहमत नगर येथे असून ती 32,673 इतकी आहे. तर सर्वात कमी जनसंख्या प्रभाग क्र. 9 एसआरपीएफ-वडाळी येथे असून ती केवळ 20,452 इतकी आहे.
-2025 ची मतदारसंख्या विक्रमी
2022 च्या निवडणुकीसाठी मतदारसंख्या 6 लाख 8 हजार 334 ठरविण्यात आली होती. मात्र, 1 जुलै 2025 रोजी जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार अमरावती मनपा क्षेत्रात आता तब्बल 6 लाख 68 हजार मतदार आहेत. म्हणजेच 2011 ते 2025 या 14 वर्षांत दीड लाखांहून अधिक नवीन मतदार वाढले आहेत. त्यामुळे यंदा जनसंख्या व मतदारसंख्येत मोठा विरोधाभास दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button