विदर्भाच्या राजाची भव्य दिव्य विसर्जन शोभायात्रा 11 सप्टेंबरला

राजकमल चौकात महाआरती

-अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली माहिती
-मार्गात बदल; दीड किलोमीटरने वाढ
-नेत्रदीपक आतषबाजीने उजळणार अमरावती
अमरावती / 8 सप्टेंबर : खापर्डे बगीचा स्थित न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा विदर्भाचा राजा याची विसर्जन शोभायात्रा नेहमीप्रमाणेच यंदाही भव्यदिव्य पद्धतीने 11 सप्टेंबर रोजी गुरुवारी काढण्यात येणार आहे. राजकमल रेल्वे उड्डाणपुल बंद असल्याने यंदाच्या शोभायात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला असून मार्ग सुमारे दीड किलोमीटरने वाढविण्यात आला आहे. राजकमल चौकात पारंपरिक पद्धतीने महाआरती होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दिनेश बूब, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, रमेश परमार, अविनाश भडांगे, बब्बू मोतीवाला, बिट्टू सलूजा, राजू चोटी शर्मा, श्यामसुंदर काबरा, सौरभ पनपालिया, धीरज श्रीवास, भैया पवार, प्रदीप कासट आदी उपस्थित होते. पश्चिम विदर्भातून हजारो भाविक अमरावतीत दाखल होणार असल्याने त्यांच्या वाहनांसाठी सायंस्कोर मैदान, नेहरू मैदान, अंबापेठ, श्याम चौक, बापट चौक, तहसील कार्यालय, नमुना परिसर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी सिंगल लाईन पार्किंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला की, पोलिसांनी सुरुवातीला जयस्तंभ ते राजकमल उड्डाणपुलावरील मार्गाला परवानगी दिली होती; मात्र लोनिव्हीने नव्या स्ट्रक्चरल अहवालाचा दाखला देत पुल आणखी झुकल्याचे सांगितले. एकाच दिवसात पूल एवढा झुकू कसा शकतो? असा सवाल अग्रवाल यांनी उपस्थित केला. माजी महापौर विलास इंगोले यांनी सांगितले की, अमरावतीची सांस्कृतिक परंपरा बनलेली ही शोभायात्रा आणि राजकमल चौकातील महाआरती कोणत्याही परिस्थितीत कायम राहणार आहे. बबलू शेखावत यांनी व्यापार्‍यांना आणि नागरिकांना 11 सप्टेंबर रोजी आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर न आणण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून वाहतुकीतील अडथळे टाळता येतील.
-शोभायात्रेचा मार्ग
11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मंडळात आरती करून विदर्भाच्या राजाची शाही शोभायात्रा सुरू होईल. इर्विन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक मार्गे शोभायात्रा राजकमल चौकात पोहोचेल. तेथे महाआरती व आतषबाजी होईल. त्यानंतर पुन्हा श्याम चौक, सिटी कोतवाली, वसंत चौक, दीपक चौक मार्गे मोसीकाल येथे विसर्जन होणार आहे.
-डझनभर ढोलपथक, झांजपथके आणि झांकी
या शोभायात्रेत स्वराज्य, छत्रपती, राम राज्य, शौर्य रूद्र, जगदंब, शिव साम्राज्य, दैवत, हिंदवी स्वराज्य, शिव राष्ट्र, राज्य सम्राट, धामणगाव यांसह डझनभर ढोलपथके सहभागी होणार असून आकर्षक झांकी, पारंपरिक झांजपथके आणि भव्य आतषबाजीने उत्सवाला रंगत येणार आहे. पथकांसाठी तीन पारितोषिके ठेवली असून पाच सदस्यीय समिती त्यांची निवड करणार आहे. तसेच डी. स्टेट आर्ट सेंटरतर्फे मार्गावर रंगीबेरंगी कलात्मक रांगोळ्या काढल्या जातील, असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
-वाहतुकीत बदल
शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख रस्ते बंद राहणार असून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. इर्विन चौकाकडे जाणारा वाहतूक मार्ग मुलींच्या हायस्कूल चौकातून लेखूमल चौकाकडे वळविला जाईल. राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक येथील वाहतूक गद्रे चौकातून उड्डाणपुल, गांधी चौक, जवाहर गेटकडे मोडली जाईल. दीपक चौक ते मोसीकाल दरम्यानची वाहतूक विलासनगरमार्गे लेखूमल चौकाकडे नेली जाईल. राजकमल चौक ते दीपक चौक मार्गावरील वाहतूक चित्रा चौकातून वळविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button