ट्रकची ऑटोला धडक, सहा ठार, दोन गंभीर

राजुरा-गडचांदूर मार्गावर अपघात

चंद्रपूर / 28 ऑगस्ट : राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करुण अंत झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तिन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे पाचगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. राजुरा येथून पाचगावकडे जात असलेल्या एका ऑटोला विरुद्ध दिशेने येणार्‍या हायवा ट्रकने जबर धडक दिली. दुपारी सुमारे 4 वाजता ही दुर्घटना घडली. या धडकेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आणि आणखी दोन महिलांचा रस्त्यात मृत्यू झाला. गंभीर जखमींमध्ये एकास चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून दुसर्‍यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत.
राजुरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सध्या महामार्गाचे काम सुरू असून वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र यासाठी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याने ऑटोचालक संभ्रमात पडला आणि हायवेमध्ये घुसताच हायवाने जोरदार धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की संपूर्ण ऑटोचा चुराडा झाला. या मध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये रवींद्र हरी बोबडे (वय 48) रा . पाचगाव,शंकर कारू पिपरे (वय 50) रा . कोची,सौ. वर्षा बंडू मांदळे (वय 41) खामोना, तनु सुभाष पिंपळकर (वय 18) रा. पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार (वय 60) रा. पाचगाव व प्रकाश मेश्राम (वय 50) ऑटोचालक, पाचगाव आदींचा समावेश आहे. तर जखमींमध्ये निर्मला रावजी झाडे (वय 50) रा . पाचगाव आणि भोजराज महादेव कोडापे (वय 40) रा भुरकुंडा – यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Back to top button