मराठा आंदोलनाला हायकोर्टाचा झटका! आझाद मैदानात मनाई
न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाही फटकारले

-मनोज जरांगेचा ठाम इशारा – आंदोलन होणारच!
मुंबई / 26 ऑगस्ट : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची हाक दिली होती. या आंदोलनात ते आमरण उपोषण करणार होते आणि राज्यभरातील आंदोलकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. परंतु मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानात आंदोलनासाठी मनाई केली आहे. याचिकाकर्ते अॅमी फाऊंडेशनलाही न्यायालयाने फटकारले आहे.
हायकोर्टाने स्पष्ट केले की, जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांना शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु आझाद मैदान हे व्यस्त आणि व्यावसायिक भाग असल्याने परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, खारघर येथे पर्यायी मैदान उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे मुंबईतील दैनंदिन जीवन आणि कायदा-सुव्यवस्था प्रभावित होणार नाही. जरांगेंना या याचिकेत पक्षकार केले नाही, तोपर्यंत विचार केला जाणार नाही. युक्तीवाद करत राहिलात तर याचिका फेटाळली जाईल. यामुळे आंदोलकांच्या मार्गावर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न नाकाम ठरला आहे.
दरम्यान, याचिकाकर्ते अॅमी फाऊंडेशनला यावेळी हायकोर्टानं फटकारलं, कोर्टानं म्हटलं की, तुम्ही दाखल केलेल्या याचिकेत जरांगेंना पक्षकार करण्यात आलेलं नाही. त्यामुळं त्यांना जोपर्यंत या याचिकेत पक्षकार केलं जात नाही तोपर्यंत आम्ही या याचिकेचा विचार करणार नाही. पण तरीही तुम्ही अशाच पद्धतीनं युक्तीवाद करत राहिलात तर आम्ही तुमची याचिका फेटाळून लावू, अशा शब्दांत हायकोर्टानं ताशेरे ओढले.
आता एकीकडं हायकोर्टानं परवानगी नसल्यानं आझाद मैदानात आंदोलनाला मनाई केली आहे. तर दुसरीकडं मनोज जरागें यांनी आंतरवली सराटीतून सांगितलं की, हायकोर्टानं आम्हाला परवानगी नाकारलेली नाही, उलट हायकोर्ट आम्हाला परवानगी देईल, याबाबत आमचे वकील अजूनही प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आम्ही उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळीच मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहोत. जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करणार्या अॅमी फाऊंडेशनचे वकील महेंद्र रत्ना म्हणाले, त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आंदोलन अत्यंत गर्दीचे व वर्दळीचे ठिकाण असलेल्या आझाद मैदानात होउ नये अशी आमची मागणी आहे.
-आता माघार नाही!
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकताना, मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आता सरकारला बोलायला कुठेही जागा नाही, आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही आणि न्याय मिळवणारच,’ असा थेट इशारा देत त्यांनी मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.
-आरक्षण उपसमिती म्हणजे निव्वळ ‘रडगाणं’
सरकारने नेमलेल्या आरक्षण उपसमितीच्या कार्यपद्धतीवर जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आरक्षण उपसमिती नेहमीच बैठका घेते. ही उपसमिती म्हणजे पहिलंच रडगाणं आहे. अंमलबजावणीसाठी एवढा वेळ का लागत आहे? कुणीही अंमलबजावणी द्या, अगदी कोतवालाच्या हातून दिली तरी चालेल, पण ती तात्काळ झाली पाहिजे.’




