जिल्ह्यात तालुकावार पावसाची चढ-उतार स्थिती

तिवसा अव्वल, चांदूर रेल्वे-दर्यापूरही मुसळधार

-शहर परिसरात पावसाची सरबत्ती
अमरावती / 17 ऑगस्ट : गत चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक अशा स्वरूपात जाणवत आहे. जिल्ह्याची एकत्रित सरासरी 136.2 मि.मी. वर पोहोचली असून मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 15 टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 14 पैकी 10 तालुके सरासरीपेक्षा जास्त पावसावर तर मेळघाटाचा पट्टा मात्र मागेच राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
तिवसा तालुक्यात गेल्या चार दिवसांत तब्बल 50.8 मि.मी. पाऊस कोसळून प्रगतीशील सरासरी 184 टक्क्यांवर गेली आहे. जिल्ह्यातील हा सर्वाधिक दर आहे. चांदूर रेल्वेत 29.3 मि.मी. पाऊस पडून एकूण नोंद 208.1 मि.मी. झाली आहे. या तालुक्यात 175 टक्के इतका पाऊस पडला आहे. दर्यापूर तालुक्यालाही 26.2 मि.मी. पावसाची जोड मिळाल्याने सरासरी 112.7 टक्क्यांवर गेली आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालय अमरावती तालुक्यात मागील चार दिवसांत 35.3 मि.मी. पाऊस नोंदला गेला असून प्रगतीशील पावसाची टक्केवारी 119.2 झाली आहे. भातकुलीला 29.9 मि.मी., नांदगाव खंडेश्वरला 31.2 मि.मी. आणि मोर्शीला 25.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यांत प्रगतीशील टक्केवारी 126 ते 139 दरम्यान आहे. अमरावती जिल्ह्यात 17 ऑगस्टपर्यंत 576.7 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी याच काळात ही मात्रा 548.1 मि.मी. इतकी होती. यंदा एकूण पावसाची टक्केवारी 107.2 असून, मागील वर्षी ती 94.6 होती.
जिल्ह्यात पावसाची सरासरी समाधानकारक असली तरी तालुका-निहाय असमानतेचे चित्र प्रकर्षाने दिसते. तिवसा, चांदूर रेल्वे, भातकुली, नांदगाव खंडेश्वर यांनी सरासरीचा उच्चांक गाठला असताना मेळघाटातील धारणी-चिखलदरा भाग मात्र पावसाला अजूनही तळमळत आहे. शेतकर्‍यांच्या पिकांवर या परिस्थितीचा थेट परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
-मेळघाटात पावसाची कमतरता
चिखलदरा व धारणी या मेळघाटातील प्रमुख तालुक्यांना पावसाने दडी मारली आहे. चिखलदरात केवळ 3.7 मि.मी. आणि धारणीत 18.2 मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांची प्रगतीशील सरासरी अनुक्रमे 30.3 व 39 टक्क्यांवरच आहे. अचलपूर तालुकाही 46.3 टक्क्यांवरच थांबला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button