मतचोरीच्या मुद्यामुळे माझ्या जीवाला धोका
राहुल गांधीं यांचा दावा

* दोन नेत्यांकडून धमकी मिळाल्याचा याचिकेत उल्लेख
* संरक्षण देण्याची पुणे न्यायालयाकडे विनंती
पुणे /13 ऑगस्ट : 2024 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावतीने बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात देण्यात आली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली. मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपाचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहाता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे.न्यायालयात दिलेल्या या माहितीमध्ये असेही लिहिले आहे की, भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबद्दल राहुल गांधी यांना संपूर्ण आदर आहे. तरीही हा खटला जसाजसा पुढे जातो आहे, तस तसा वाढणारा दबाव आणि बाहेरील असामान्य परिस्थिती यांची न्यायालयाने दखल घेतली पाहिजे. ज्या विचारधारेच्या लोकांनी हा खटला दाखल केला आहे, ते समाजात तेढ निर्माण करण्यासाठी धार्मिक वातावरण कलुषित करण्यासाठी, निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी आणि ठराविक उद्योजकांचे भले करण्यासाठी परिचित आहे, असे लेखी माहितीमध्ये म्हटले आहे. हिंदूत्वाचे समर्थन करणारे जहालमतवादी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला लिहिले आहे.




