रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना धक्का?
सरकारने दिला मोठ्या कारवाईचा इशारा

मुंबई/6 ऑगस्ट – राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनाबाबत मोठा वादंग उफाळला आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली होती. योजनेचा उद्देश गरीब बहिणींना आर्थिक मदत करून त्यांच्या संसाराला हातभार लावणे हा होता. मात्र या योजनेचा लाभ अनधिकृतपणे घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनीदेखील या योजनेत लाभ घेतला आहे, तर काही महिलांकडे सरकारी नोकरी असूनही त्यांनी हक्क नसतानाही रक्कम उचलली आहे. एवढ्यावरच थांबत नाही, तर धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 14 हजार पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. फक्त महिलांसाठी असलेल्या या योजनेत अशी मोठी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सरकारने या संदर्भात कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. जिल्हाधिकार्यांकडून पुढील 15 दिवसांत खात्यांची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. अनधिकृत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांकडून रक्कम परत वसूल केली जाणार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या अगदी तोंडावर ही कारवाई होण्याची शक्यता असल्याने अनेक लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे. या प्रकरणामुळे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.




